सात वर्षांपासून फुप्फुसात अडकलेली लवंग बाहेर काढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2022 07:02 PM2022-02-03T19:02:48+5:302022-02-03T19:04:50+5:30
Nagpur News तब्बल सात वर्षांपासून फुफ्फुसात अडकून पडलेली लवंग बाहेर काढून रुग्णाला दिलासा दिल्याची शस्त्रक्रिया नागपुरात पार पडली.
नागपूर : दोन-तीन वर्षांपासून असलेला खोकल्याचा त्रास मागील तीन महिन्यांत अधिकच वाढला. दम लागण्यासोबतच थुंकीतून रक्तही येत होते. एका डॉक्टरांनी तर छातीच्या कॅन्सरची शक्यताही वर्तवली. श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांच्याकडे हा रुग्ण आला. त्यांनी तपासणी केली, हा कॅन्सर नव्हे तर छातीत लवंग अडकल्याचे निदान केले. अनुभव, कौशल्य व अद्ययावत यंत्राच्या मदतीने त्यांनी तब्बल सात वर्षांपासून छातीत अडकलेली लवंग बाहेर काढली.
शहरातील रहिवासी असलेली ३६ वर्षीय महिला खोकल्याच्या समस्येने त्रासून गेली होती. यातच मागील काही दिवसांत खोकल्याद्वारे दम लागणे, वजन कमी होणे, छातीमध्ये दुखणे व अधूनमधून थुंकीत रक्त येणे; अशी लक्षणेही होती. रुग्णाने ओळखीच्या एका डॉक्टरांना दाखविले. त्यांनी सीटी स्कॅन केला. यात डाव्या फुप्फुसाच्या खालच्या भागात गाठ व न्युमोनिया असल्याचे निदान केले. ही गाठ कर्करोगाची असू शकते, अशी शक्यता त्या डॉक्टरांनी वर्तवली. त्यामुळे ‘ब्रॉन्कोस्कोपी’ करून ‘बायस्पी’ घेण्यात आली. परंतु काही निष्पन्न झाले नाही. यामुळे ‘सीटी गायडेड बायप्सी’ करण्यात आली. त्यामध्येही कुठलेही निदान झाले नाही. या उपचारात दोन महिने निघून गेले. परंतु आजार कमी झालेला नव्हता उलट वाढला होता. रुग्णाची घरातील परिस्थिती बदलून गेली होती. शेवटचा पर्याय म्हणून रुग्ण प्रचंड घाबरलेल्या स्थितीत रुग्ण डॉ. अशोक अरबट यांच्याकडे आला.
‘लोकमत’शी बोलताना डॉ. अरबट म्हणाले, प्रथमत: रुग्णाला मानसिक आधार दिला. रुग्णाची पुन्हा ‘ब्रॉन्कोस्कोपी’ करून ‘क्रायो बायस्पी’ म्हणजे थोडा मोठा तुकडा घेऊन तपासणी केली. यात हा कॅन्सर नसल्याचे निदान झाले. रुग्ण व त्यांच्या पतीशी चर्चा केल्यावर असे लक्षात आले की, सात वर्षांपूर्वी घश्यात काही तरी अडकले होते असे त्यांनी सांगितले. यामुळे ब्रॉन्कोस्कोपी करून छातीचा भाग स्वच्छ केला तेव्हा तेथे काही तरी अडकल्याचे स्पष्ट झाले. श्वासनलिकेमध्ये (ब्रॉन्कस) ‘डायलेटेशन’ करून म्हणजे, छोटा फुगा आत टाकत ती वाट मोकळी केली. आत लवंग अडकल्याचे स्पष्ट झाले. विशेष प्रयत्नानंतर लवंग बाहेर काढण्यात यश आले. या प्रक्रियेत डॉ. अरबट यांच्या मार्गदर्शनात श्वसनरोगतज्ज्ञ डॉ. स्वप्निल बाकमवार, डॉ. परिमल देशपांडे, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. आशुतोष जयस्वाल यांनी सहकार्य केले.
-अन्यथा फुप्फुसाचा भाग कापावा लागला असता
लवंग ही डाव्या फुप्फुसाच्या खालच्या भागात अडकून होती. तेथे पोहोचणे फार कठीण होते. जर निदान झाले नसते तर किंबहुना फुप्फुसाचा हा भाग कापावा लागला असता. मात्र, ती वेळ आली नाही. लवंग बाहेर काढल्यानंतर रुग्णाला पूर्ण आराम मिळाला आहे.
-डॉ. अशोक अरबट, ज्येष्ठ श्वसनरोगतज्ज्ञ