इस्पितळांच्या परवान्याचे नूतनीकरण करा : ‘आयएमए’चे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 12:53 AM2020-05-26T00:53:13+5:302020-05-26T00:54:48+5:30
दरवर्षी महानगरपालिकेतर्फे इस्पितळांच्या परवान्याचे नूतनीकरण नर्सिंग होम कायद्यांतर्गत होत असते. यंदा प्रशासन कोरोनाविरुद्ध लढण्यात व्यस्त आहे. यामुळे अनेक इस्पितळांचे नूतनीकरण झाले नाही. त्यामुळे अशा इस्पितळांना परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत नवा परवाना द्यावा, असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने (आयएमए) पत्रपरिषदेतून करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दरवर्षी महानगरपालिकेतर्फे इस्पितळांच्या परवान्याचे नूतनीकरण नर्सिंग होम कायद्यांतर्गत होत असते. यंदा प्रशासन कोरोनाविरुद्ध लढण्यात व्यस्त आहे. यामुळे अनेक इस्पितळांचे नूतनीकरण झाले नाही. त्यामुळे अशा इस्पितळांना परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत नवा परवाना द्यावा, असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने (आयएमए) पत्रपरिषदेतून करण्यात आले. यावेळी आयएमएचे पॅट्रन अध्यक्ष डॉ. अशोक अढाव, आयएमए नागपूरचे अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला व सचिव डॉ. मंजुषा गिरी उपस्थित होत्या.
डॉ. अढाव म्हणाले, कोविड-१९ हा नवा आजार असल्याने त्याचे स्वरुप अजून स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे मार्गदर्शक तत्वे बदलत असतात. अशा वेळी जुन्या मार्गदर्शक तत्वांचा संदर्भ देऊन डॉक्टरांना वेठीस धरण्याचे प्रकारही उघडकीस येत आहेत. असे होऊ नये म्हणून शासनाने नव्या मार्गदर्शक सूचनांनंतर जुन्या सूचना रद्द झाल्या असेही नव्या सूचना काढताना नमूद करावे. शिवाय, डॉक्टरांना शासनातर्फे वारंवार नोटीस येतात. अशा वेळी आयएमएशी प्रशासनाने चर्चा करावी असेही आवाहनही त्यांनी केले. पत्रपरिषदेला डॉ. मिलिंद नाईक, डॉ. वाय.एस. देशपांडे, डॉ. कृष्णा पराते, डॉ. वंदना काटे, डॉ. संजय देशपांडे, डॉ. प्रकाश देव, डॉ. आशिष दिसावल, डॉ. राफत खान, डॉ. अर्चना कोठारी, डॉ. आलोक उमरे, डॉ. अनिरुद्ध देवके, डॉ. अर्चना देशपांडे, डॉ. संजय देवतळे , डॉ. राजेश सावरबांधे, डॉ. सचिन गाथे, डॉ. दिनेश अग्रवाल, डॉ. गौरी अरोरा उपस्थित होते.
१५हजार स्थलांतरित मजुरांची तपासणी
अध्यक्ष डॉ. झुनझुनवाला म्हणाले, कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर ‘मिशन ह्युमॅनिटी’ उपक्रमाच्या माध्यमातून तब्बल १५ हजार स्थलांतरित मजुरांची तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. याशिवाय, शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना ‘एन-९५’ मास्क, फेश शिल्ड व सॅनिटायजरचे वितरण केले. स्थलांतरीत महिलांना फिमेल युटिलिटी किट देण्यात आल्या. त्यामध्ये सॅनिटरी नॅपकीनचा समावेश आहे.
कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी टास्क फोर्स
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये आयएमएचे अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला आणि माजी अध्यक्ष डॉ. संजय देशपांडे यांचा समावेश करण्यात आला आहे. याद्वारे कोरोनाच्या संसर्गावर प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजनांच्या संदर्भात तसेच खासगी वैद्यकीय व्यवसायिक आणि शासनादरम्यान समन्वय साधला जाणार आहे.