नव्याने सुरू होणार मार्कण्डा देवस्थानाचा जीर्णोद्धार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2022 07:45 AM2022-03-01T07:45:00+5:302022-03-01T07:45:02+5:30
Nagpur News गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात असलेल्या विश्वप्रसिद्ध मार्कण्डा देवस्थानाच्या जीर्णोद्धाराचे काम नव्याने सुरू होणार असल्याची ग्वाही भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अंकिता देशकर
नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात असलेल्या विश्वप्रसिद्ध मार्कण्डा देवस्थानाच्या जीर्णोद्धाराचे काम नव्याने सुरू होणार असल्याची ग्वाही भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. साधारणत: या कामाला नव्या वित्त वर्षात एप्रिल-मे २०२२ मध्ये सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
देवस्थानाच्या जीर्णोद्धाचे काम डिसेंबर २०१५ मध्ये सुरू झाले होते. मात्र, ऐनकेन अडथळ्यांमुळे ते काम कधीच पूर्णत्वास गेले नाही. आता हे काम पुन्हा नव्याने सुरू होणार असल्याने इतिहासप्रेमींमध्ये उत्साह संचारला आहे. देवस्थानाच्या जीर्णोद्धारासाठी गेल्यावर्षी प्राप्त झालेला निधी संपला असून, पुढच्या अर्थसंकल्पात निधी मंजूर होण्याची प्रतीक्षा असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले. आतापर्यंत केवळ विकासकामांवर भर देण्यात आला असून, अतिक्रमण दूर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जीवघेण्या कोरोना संक्रमणाचा काळवगळता, २०१७ पासून जीर्णोद्धारामध्ये अनेक तांत्रिक समस्या निर्माण झाल्यानेही कामाची गती मंदावल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.
शेवटचे चित्र १९०४ सालचे
मंदिराचे उपलब्ध शेवटचे चित्र १९०४ सालचे असून, जीर्णोद्धाराची प्रक्रिया अतिशय संथ असते. मंदिराला पूर्वीचे वैभव प्राप्त होण्यासाठी किमान पाच वर्षाचा कालावधी लागतो. मात्र, गेल्या पाच वर्षात ५० टक्के कामही झालेले नाही. मंदिरावर असणाऱ्या ३० पेक्षा जास्त लेअर्सचे काम अजून शिल्लक आहे. मुख्य मंदिराचे काम पूर्ण झाल्यावरच आवारातील २४ लहान मंदिरांच्या संवर्धनाचे काम सुरू होईल. हेमाडपंती शैलीतील आठव्या ते बाराव्या शतकादरम्यानचे हे मंदिर असल्याचे एएसआय अधिकाऱ्यांनी सांगितले.
महाशिवरात्रीच्या पर्वावर मोठ्या संख्येने भाविक येतात. या यात्रेमुळे जीर्णोद्धाराच्या कामात अडथळे येणार नाहीत, याची काळजी प्रशासकीय अधिकारी घेत असून, केवळ याच दिवशी भक्तांना गर्भगृहात जाऊन आशीर्वाद घेण्याची परवानगी असते, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.