सरस्वतीची प्रतिमा ठेवली म्हणून प्रख्यात कवी यशवंत मनोहरांनी नाकारला पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 08:15 PM2021-01-14T20:15:48+5:302021-01-14T20:16:35+5:30
Nagpur News : विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती पुरस्कारांचे आज होते वितरण, अगोदर दिले होते संमतीपत्र
नागपूर - कार्यक्रमस्थळी सरस्वतीची प्रतिमा ठेवली म्हणून प्रसिद्ध कवी डॉ.यशवंत मनोहर यांनी विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती पुरस्कार नाकारला आहे. या कार्यक्रमात सहभागी होऊन पुरस्कार स्विकारणार असे संमतीपत्र त्यांनी दिले होते. मात्र ऐनवेळी त्यांनी पुरस्कार नाकारल्याचा संदेश आयोजकांना पाठविला. यामुळे साहित्य वर्तुळात खळबळ उडाली आहे.
विदर्भ साहित्य संघातर्फे मागील महिन्यात पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. डॉ.मनोहर यांना जीवनव्रती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होते मात्र कार्यक्रमात सरस्वतीची प्रतिमा ठेवू नये अशी मागणी डॉ.मनोहर यांनी केली होती. परंपरेप्रमाणे साहित्य संघातर्फे सरस्वतीची प्रतिमा ठेवण्यात आली. यामुळे नाराज झालेल्या डॉ.मनोहर यांनी कार्यक्रमस्थळी येऊन पुरस्कार घेण्यासच नकार दिला. मराठी साहित्यातील माझी प्रखर इहबुद्धिवादी प्रतिमा लक्षात घेऊन आपण अशा दुरुस्त्या कराल असं वाटलं होतं. हा वाङ्मयीन कार्यक्रम आहे आणि त्यात धर्म येणं मला अजिबात मान्य नाही. म्हणून आपण मला दिलेला जीवनव्रती हा पुरस्कार मी नाकारण्याचा निर्णय घेतलेला आहे, असे पत्र डॉ.मनोहर यांनी साहित्य संघाला पाठविले.