नाकारलेल्या दीड लाख वॅगन्सची रेल्वेकडून दुरूस्ती
By नरेश डोंगरे | Published: May 24, 2024 09:53 PM2024-05-24T21:53:55+5:302024-05-24T21:54:25+5:30
मालवाहतुकीतून मालामाल : ९८६ कोटींचा अतिरिक्त महसूल.
नागपूर : मालवाहतुकीसाठी अयोग्य असल्याचा ठपका ठेवून नाकारण्यात आलेल्या सुमारे दीड लाख वॅगन्सची नव्याने दुरूस्ती करून रेल्वे प्रशासनाने त्या वापरात आणल्या. या माध्यमातून मध्य रेल्वेला ९८६ कोटी रुपयांचा अतिरिक्त महसुल मिळाल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात चंद्रपूर, बल्लारशाह, घुग्गूस, वणी, माजरी उमरेड तसेच मकरधोकडा या भागात मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी आहेत. त्यामुळे त्या-त्या ठिकाणच्या रेल्वे स्थानकावरून विविध ठिकाणी कोळसा पाठविला जातो. या कोळसा वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या रेल्वेच्या वॅगन्स वारंवार वापरात येत असल्याने ठिकठिकाणाहून त्या डॅमेज होतात. अर्थात, कुण्या वॅगनची फ्लोअर, कुणाचे दार तर कुण्या वॅगनचा दुसराच कोणता पार्ट खराब होतो. अशा वॅगन्समधून मालवाहतूक करणे धोकादायक ठरते. त्यामुळे डॅमेज झालेली वॅगन लोडिंगसाठी उभी झाल्यास तिची तपासणी करणाऱ्या स्टाफकडून ती वापरायोग्य नाही, असा शेरा मारून त्या वॅगनला बाहेर काढले जाते.
२०२३-२४ या वर्षभराच्या कालावधीत अशा प्रकारे चंद्रपूर, बल्लारशाह, घुग्गूस, वणी, माजरी उमरेड तसेच मकरधोकडा या साईडिंगवरून तब्बल १, ५४, ८७२ वॅगन्स वापरण्यायोग्य नसल्याने नाकारण्यात आल्या होत्या. त्यातील १, ४८, ३२८ वॅगन्सची दुरूस्ती करून त्या वापरण्यायोग्य बनविण्यात मध्य रेल्वेने यश मिळवले. दुरस्तीनंतर त्या चांगल्या झाल्या की नाही, त्याचा वापर खरेच केला जाऊ शकतो का, हे तपासण्यासाठी रेल्वेचा एक स्वतंत्र विभाग आहे. तो त्या वॅगन्सची तपासणी केल्यानंतर तसे प्रमाणपत्र जारी करतो. या विभागाने नाकारण्यात आलेल्या वॅगन्सपैकी दुरूस्तीनंतर ९६ टक्के वॅगन्स वापरण्यायोग्य असल्याचे प्रमाणित केले. त्यामुळे त्या वॅगन्सचा पुन्हा वापर सुरू झाला असून त्यातून नागपूर विभागाला ९८५.७९ कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळाल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.