पुन्हा झाले जेल ब्रेक
By admin | Published: May 17, 2015 02:47 AM2015-05-17T02:47:36+5:302015-05-17T02:47:36+5:30
राज्याच्या सुरक्षा यंत्रणेला प्रचंड हादरा देणाऱ्या जेल ब्रेक प्रकरणाची शनिवारी पुन्हा एकदा मध्यवर्ती कारागृहात पुनरावृत्ती झाली.
नागपूर : राज्याच्या सुरक्षा यंत्रणेला प्रचंड हादरा देणाऱ्या जेल ब्रेक प्रकरणाची शनिवारी पुन्हा एकदा मध्यवर्ती कारागृहात पुनरावृत्ती झाली. ४७ दिवसानंतर याच कारागृहात पुन्हा तसेच पाच कैदी भल्या सकाळी कारागृहातून पळाले. मात्र, यावेळी या कैद्यांना पोलिसांनी स्वमर्जीनेच ‘जेल ब्रेक’चे आदेश दिले होते. पळून जाणाऱ्यांमध्ये दोन असली तर तीन डमी कैदी होते. हे सर्व २३ फूट उंचीची भिंत ओलांडून खाली येताच पोलिसांनी त्यांना लगेच आपल्या वाहनात कोंबले आणि गुन्हे शाखेत नेले. होय, दीड महिन्यांपूर्वी घडलेल्या जेल ब्रेकचे हे डेमॉन्स्ट्रेशन होते.
मध्यवर्ती कारागृहातून पळालेल्या आणि तब्बल दीड महिन्यानंतर हाती लागलेल्या कुख्यात शिबू आणि नेपालीकडून शनिवारी सकाळी गुन्हेशाखेच्या पथकाने ‘जेल ब्रेक’चा डेमो (प्रात्यक्षिक) करून घेतला. भल्या सकाळी झालेल्या या प्रात्यक्षिकाच्या वेळी गुन्हेशाखेचा मोठा ताफा आणि राज्य कारागृह प्रशासनाच्या प्रमुख, एडीजी मीरा बोरवणकर उपस्थित होत्या.
३१ मार्चच्या पहाटे २ ते ४ या वेळेत शिबू ऊर्फ मोहम्मद शोएब सलिम खान, प्रेम ऊर्फ नेपाली शालीकराम खत्री, सत्येंद्र ऊर्फ राहुल राजबहादूर गुप्ता (वय २५, रा. कामठी, नागपूर), बिशनसिंग रम्मूलाल उके (रा. धुमाळ, जि. शिवनी मध्यप्रदेश) आणि गोलू ऊर्फ आकाश रज्जूसिंग ठाकूर (वय २३, रा. नागपूर) हे पाच कैदी कारागृहातून पळून केले होते. ते सर्व कारागृहाच्या बराक क्रमांक ६ मध्ये १५४ कैद्यांसोबत बंदिस्त होते. या प्रकरणामुळे कारागृह प्रशासनाला जबरदस्त हादरा बसला होता. पोलीस प्रशासनातही प्रचंड खळबळ निर्माण झाली होती. गुन्हेशाखेने या कैद्यांचा छडा लावण्यासाठी अथक परिश्रम घेतले. मात्र, त्यांना यश आले नाही. आरपीएफच्या बैतुलमधील पोलीस निरीक्षक चंदनसिंग बिस्ट आणि संजय सोनीच्या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे शिबू आणि नेपाली तसेच त्यांचा साथीदार अरमान मुन्ना (जालौन, उत्तररप्रदेश) गुन्हेशाखेच्या हाती लागला. १४ मेला त्यांना ताब्यात घेतल्यापासून पोलीस त्यांची चौकशी करीत आहेत. या पार्श्वभूमीवर, आज सकाळी गुन्हेशाखेच्या उपायुक्त दीपाली मासिरकर यांनी भल्या मोठ्या ताफ्यासोबत शिबू आणि नेपालीला कारागृहात नेले. तेथे शिबू आणि नेपालीकडून ते कसे पळाले याचे प्रात्यक्षिक करवून घेण्यात आले. यावेळी एडीजी बोरवणकर, कारागृह अधीक्षक योगेश देसाई उपस्थित होते. (प्रतिनिधी)