पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांचा अहवाल द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 11:51 PM2020-06-02T23:51:34+5:302020-06-02T23:53:10+5:30
राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. त्यांना पीक कर्ज वेळेवर उपलब्ध करण्याच्या सूचनादेखील बँकांना दिल्या आहेत. तरीही यात बँक टाळाटाळ करत असतील तर अशा बँकांचा अहवाल द्या आणि त्यांच्यावर कारवाई करा, अशा सूचना कृषिमंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी नागपुरातील आढावा बैठकीत दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. त्यांना पीक कर्ज वेळेवर उपलब्ध करण्याच्या सूचनादेखील बँकांना दिल्या आहेत. तरीही यात बँक टाळाटाळ करत असतील तर अशा बँकांचा अहवाल द्या आणि त्यांच्यावर कारवाई करा, अशा सूचना कृषिमंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी नागपुरातील आढावा बैठकीत दिल्या.
मंगळवारच्या नागपूर जिल्हा दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातून कृषिमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नागपूर विभागाचा आढावा घेतला. गृहमंत्री अनिल देशमुख, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभोजकर, कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यावेळी उपस्थित होते. या बैठकीत नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याचा आढावा घेतला. खते व बियाणे चढ्या भावाने विकणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मंत्र्यांनी बैठकीत दिले. शेतकऱ्यांनी घरगुती बियाण्यांचा जास्तीत जास्त वापर करावा. या बियाण्याच्या उगवण क्षमतेच्या प्रयोगाबाबत कृषी विभागाने गावपातळीवर मार्गदर्शन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
पीएम किसान योजनेचा आढावा यावेळी घेण्यात आला. योजनेची व्यापकता वाढवून जास्तीत जास्त शेतकºयांना या योजनेचा लाभ देण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. युरियामुळे जमिनीचा पोत खराब होत असल्याचे निदर्शनास आले असून, युरियाचा जपून वापर करण्याबाबत जागृती करण्याचे आवाहन मंत्र्यांनी केले. टोळधाडीचा आढावा घेऊन केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी समजून घेतली. ड्रोन फवारणीच्या नियोजनाबाबत निर्णय घेण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. प्रधानमंत्री किसान योजनेत वर्धा जिल्हा व कर्जमुक्ती योजनेत चंद्रपूर जिल्ह्याने चांगले काम केल्याबद्दल त्यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले.