कोरोना रिपोर्ट २४ तासांत द्या : आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे सक्त निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 11:44 PM2021-02-15T23:44:18+5:302021-02-15T23:46:18+5:30
Commissioner Radhakrishnan b. Strict instructions on Corona Report शासकीय व खासगी लॅबमधील कोरोना चाचणीचा रिपोर्ट २४ तासांत द्या, असे सक्त निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरातील कोरोना बाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी मनपाने चाचण्यांची संख्या वाढविली आहे. मात्र, चाचणी केल्यानंतर रुग्ण कुणाच्याही संपर्कात येऊ नये व त्याला त्वरित उपचार मिळावे, यासाठी चाचणीचा रिपोर्ट लवकर मिळणे आवश्यक आहे. शासकीय व खासगी लॅबमधील कोरोना चाचणीचा रिपोर्ट २४ तासांत द्या, असे सक्त निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत.
कोरोना बाधितांच्या संख्येचा आढावा घेण्यासाठी आयुक्तांनी सोमवारी मनपा मुख्यालयातील कोरोना वॉररूममध्ये शहरातील शासकीय व खासगी लॅबच्या डॉक्टरांची विशेष बैठक घेतली. अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, संजय निपाणे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर, डॉ.नरेंद्र बहिरवार, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी आदी उपस्थित होते.
चाचणीसाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंदणी करताना, त्याचा संपूर्ण पत्ता व मोबाइल क्रमांक घेणे अनिवार्य आहे. पत्ता अचूक नसल्यास संबंधित रुग्णाचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होऊ शकणार नाही व रुग्णांची संख्या वाढतच राहील. त्यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये कुठलीही अडचण येऊ नये, यासाठी नागरिकांनीही आपला अचूक पत्ता व मोबाइल क्रमांक नमूद करावे, असे आवाहनही आयुक्तांनी केले. मनपाच्या कोरोना चाचणी केंद्रावर कार्यरत कर्मचाऱ्यांनी नागरिकांचा पूर्ण पत्ता व्यवस्थित नमूद करणे आवश्यक आहे. याबाबत कुठल्याही प्रकारचा कामचुकारपणा निदर्शनास आल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.
बाधितांवर वेळीच उपचार करा
लक्षणे असलेल्या कोरोनाबाधित रुग्णावर वेळीच उपचार करा. मात्र, ज्यांना काहीही लक्षणे नाही, असे बाधित इतरांसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे कोरोनाचा रिपोर्ट लवकर मिळाल्यास संबंधित रुग्णांच्या उपचार आणि विलगीकरणाबाबत आवश्यक ती कार्यवाही जलद गतीने करणे शक्य होणार आहे. त्या दृष्टीने सर्व लॅबनी कार्यवाही करण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिले.