सलमानविरुद्ध गुन्हा नोंदवा
By admin | Published: June 26, 2016 02:53 AM2016-06-26T02:53:52+5:302016-06-26T02:53:52+5:30
महिलांसाठी लज्जास्पद ठरेल, असे कथित वक्तव्य करणारा आघाडीचा अभिनेता सलमान खान याच्याविरुद्ध तक्रार देऊन पाच दिवस झाले ...
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सीताबर्डी ठाण्यात : धरणे, घोषणाबाजी
नागपूर : महिलांसाठी लज्जास्पद ठरेल, असे कथित वक्तव्य करणारा आघाडीचा अभिनेता सलमान खान याच्याविरुद्ध तक्रार देऊन पाच दिवस झाले तरी पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्या नूतन रेवतकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात धरणे दिले. सलमानविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करा, अशी त्यांची मागणी होती.
‘शूटिंगमुळे आलेल्या थकव्याने बलात्कार झालेल्या महिलेसारखी अवस्था झाल्यासारखे वाटते’, असे वादग्रस्त वक्तव्य करून गेल्या आठवड्यात सलमान खानने वादळ उठवले होते. त्याच्या या वक्तव्याचा निषेध नोंदवत मंगळवारी २१ जूनला सायंकाळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आणि स्थानिक नेत्या नूतन रेवतकर यांच्या नेतृत्वात पन्नासावर महिलांनी झाशी राणी पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने करून सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. सलमानच्या वक्तव्यामुळे सर्वच समाजातील महिलांचा अपमान झाला असून, त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी यावेळी तक्रार अर्जातून केली होती. कारवाई झाली नाही तर राष्ट्रवादीच्या महिला तीव्र आंदोलन करतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला होता. पोलिसांनी हा अर्ज ठेवून घेतला. मात्र, त्याने हे वक्तव्य आपल्या कार्यक्षेत्रात न केल्यामुळे पोलीस शांत बसले. त्याला आता पाच दिवस झाले. या पार्श्वभूमीवर, रेवतकर यांनी आज दुपारी आपल्या कार्यकर्त्यांसह सीताबर्डी ठाणे गाठून सलमानविरुद्ध गुन्हा दाखल का झाला नाही, अशी विचारणा केली. येथे गुन्हा दाखल करा किंवा शून्यची क्राईमी करून प्रकरण मुंबईला तपासासाठी पाठवा, अशी रेवतकर याची मागणी होती. त्यासाठी त्या रात्री ८.१५ पर्यंत पोलीस ठाण्यातच ठिय्या देऊन होत्या. त्यामुळे पोलिसांची चांगलीच कोंडी झाली होती. (प्रतिनिधी)
मुंबईला प्रकरण पाठविले : ठाणेदार
हे प्रकरण मुंबईच्या बांद्रा पोलीस ठाण्यातर्फे हाताळले जात आहे. त्यामुळे आम्ही वरिष्ठांमार्फत हा तक्रार अर्ज मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पाठविल्याची माहिती या अनुषंगाने ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांनी लोकमतला दिली. तक्रारकर्त्यांचे समाधान करण्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करीत असल्याचेही बंडीवार यांनी सांगितले.