आठवडा होऊनही अहवाल तयार नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:09 AM2021-01-18T04:09:23+5:302021-01-18T04:09:23+5:30
नागपूर : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये (एसएनसीयू) १० चिमुकल्यांचा अत्यंत वेदनादायी मृत्यू प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाला ...
नागपूर : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये (एसएनसीयू) १० चिमुकल्यांचा अत्यंत वेदनादायी मृत्यू प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाला हे स्पष्ट दिसून येत असतानाही कोणावरच अद्यापही कारवाई झाली नाही. दुसरीकडे आठवडा होऊनही प्राथमिक अहवालही सादर झाला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीला पूर्वप्राथमिक अहवाल तीन दिवसांत देण्यास सरकारने सांगितले होते. मात्र समितीने नंतर दिवस वाढवून मागितले. रविवारी हा अहवाल सादर केला जाणार होता. परंतु रात्री १० वाजेपर्यंत अहवाल सादर झाला नसल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, आगीच्या घटनेची चौकशी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या समितीचे नेतृत्व विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्याकडे सोपविले. यासोबतच मुंबई महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन व अग्नी सुरक्षा आयुक्त पी.एस. रहांगदळे यांना तांत्रिक बाबींमध्ये मार्गदर्शन करण्यास नियुक्त करण्यात आले. या समितीत अन्य सहा सदस्यही आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बालरोगतज्ज्ञ, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता, अग्निशमन विभागाचे अग्निसुरक्षा तज्ज्ञ, आरोग्य सेवेतील बायोमेडिकल इंजिनीअर, जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रतिनिधी यांचा समावेश आहे. एवढा मोठा ताफा असतानाही आठ दिवस होऊनही अहवाल सादर झालेला नाही. या संदर्भात विभागीय आयुक्त व समितीचे अध्यक्ष डॉ. संजीव कुमार व आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलणे टाळले.