रिपोर्ट द्या; अन्यथा अॅक्शन : सत्तापक्षाची मनपा प्रशासनाला तंबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 10:08 PM2019-06-20T22:08:21+5:302019-06-20T22:09:10+5:30
तोतलाडोह धरणामधील पाण्याचा ‘डेड स्टॉक’ कमी झाला आहे. शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात ४० ते ४५ एमएलडीने घट झाली आहे. शहरात पाण्याची समस्या आहे. नागरिक त्रस्त आहेत. सहा महिन्यापूर्वी डिसेंबर महिन्यात सभागृहात पाणीटंचाईवर चर्चा झाली. परंतु जलप्रदाय विभागाने ‘अॅक्शन टेकन रिपोर्ट’ अद्याप सादर केलेला नाही. पाणीकपात व दूषित पाण्याच्या मुद्यावर गुरुवारी सभागृहात वादळी चर्चा झाली. यामुळे सत्ता पक्षनेते संदीप जोशी नाराज झाले. २८ जूनपूर्वी सभागृहात रिपोर्ट ठेवला नाही तर शहरातील पाणीटंचाईला आयुक्तांना जबाबदार धरू, तसेच सर्वोच्च सभागृहाच्या आदेशाचे पालन न केल्याने अधिकाऱ्यांनी निलंबन कारवाईसाठी तयार राहावे, असा इशारा जोशी यांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तोतलाडोह धरणामधील पाण्याचा ‘डेड स्टॉक’ कमी झाला आहे. शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात ४० ते ४५ एमएलडीने घट झाली आहे. शहरात पाण्याची समस्या आहे. नागरिक त्रस्त आहेत. सहा महिन्यापूर्वी डिसेंबर महिन्यात सभागृहात पाणीटंचाईवर चर्चा झाली. परंतु जलप्रदाय विभागाने ‘अॅक्शन टेकन रिपोर्ट’ अद्याप सादर केलेला नाही. पाणीकपात व दूषित पाण्याच्या मुद्यावर गुरुवारी सभागृहात वादळी चर्चा झाली. यामुळे सत्ता पक्षनेते संदीप जोशी नाराज झाले. २८ जूनपूर्वी सभागृहात रिपोर्ट ठेवला नाही तर शहरातील पाणीटंचाईला आयुक्तांना जबाबदार धरू, तसेच सर्वोच्च सभागृहाच्या आदेशाचे पालन न केल्याने अधिकाऱ्यांनी निलंबन कारवाईसाठी तयार राहावे, असा इशारा जोशी यांनी दिला.
तीन महिन्यानंतर आयोजित सर्वसाधारण सभेत काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे व भाजपाचे धरमपाल मेश्राम यांनी स्थगन प्रस्ताव आणून पाणीटंचाईवर चर्चेची मागणी केली. चर्चेला सुरुवात झाली, परंतु सभागृहात सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना जलप्रदाय विभागातील अधिकारी समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. यामुळे विरोधकांसोबतच सत्तापक्षाने प्रशासनाला धारेवर धरले.
डिसेंबर महिन्यात पाणीटंचाई निवारणासाठी चर्चा झाली होती. आता जूनचा दुसरा पंधरवडा सुरू आहे. परंतु अद्याप प्रशासनाने अॅक्शन रिपोर्ट सादर केलेला नाही. मोर्चे, धरणे व निदर्शने होत नाहीत. याचा अर्थ शहरात पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होतोय असा नाही. नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नका, असा इशारा सदस्यांनी दिला.
शहराला आता ७३० ऐवजी ६७० एमएलडी पाणीपुरवठा होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. चर्चेदरम्यान गुडधे व धरमपाल मेश्राम यांच्यात वारंवार खडाजंगी झाली. भाजपाचे वरिष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
शहरात समान पाणी वितरण होत नाही. चेहरा बघून पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते तानाची वनवे यांनी केला. ज्या भागात दूषित पाणीपुरवठा होत आहे, अशा भागातील दोषी अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. पाणी गळती वेळीच रोखली असती तर १५ दिवस पुरेल इतके पाणी वाचले असते, असे मत त्यांनी मांडले. काँग्रेसचे नगरसेवक पार्षद जुल्फेकार भुट्टो यांनी मोमीनपुरा भागातील पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला.