वीजचोरी कळवा, भरघोस बक्षीस मिळवा; चोरीच्या १० टक्के रक्कम बक्षीस म्हणून मिळणार

By आनंद डेकाटे | Published: October 28, 2023 02:47 PM2023-10-28T14:47:20+5:302023-10-28T14:47:32+5:30

माहिती कळविणाऱ्याचे नाव गुप्त ठेवल्या जाईल.

Report Power Theft, Get Big Reward; | वीजचोरी कळवा, भरघोस बक्षीस मिळवा; चोरीच्या १० टक्के रक्कम बक्षीस म्हणून मिळणार

वीजचोरी कळवा, भरघोस बक्षीस मिळवा; चोरीच्या १० टक्के रक्कम बक्षीस म्हणून मिळणार

नागपूर : वीजचोरीच्या प्रकरणांमुळे वीजहानीबरोबरच आर्थिक नुकसानही सोसावे लागत असल्याने या प्रकारास आळा घालण्यासाठी ‘महावितरण’ने ‘वीजचोरी कळवा आणि १० टक्के रक्कमेचे घसघसीत बक्षीस मिळवा’, असा उपक्रम हाती घेतला आहे, या उपक्रमाला राज्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळत आहे. भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये वीजमीटरमध्ये जाणीवपुर्वक फ़ेरफ़ार करून होणाऱ्या वीजचोऱ्यांची माहिती असणाऱ्यांनी पुढाकार घेत यासंबंधी माहिती द्यावी, माहिती कळविणाऱ्याचे नाव गुप्त ठेवल्या जाईल.

आपल्या कार्यक्षेत्राबाहेरील वीजचोरी कळवणाऱ्या ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांनाही ही बक्षीस योजना लागू असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. पूर्वी वीजचोरीची माहिती कळवल्यानंतर एक हजार रुपयांचे बक्षीस होते. मग ती वीजचोरी लाखो रुपयांची का असेना. त्यामुळे साहजिकच हवा तितका प्रतिसाद नसल्याने आता वीजचोरीची माहिती कळवणाऱ्या नागरिकास वीजचोरीच्या अनुमानित रकमेच्या १० टक्के रक्कम बक्षीस देण्याचा निर्णय ‘महावितरण’ने घेतला आहे.

या उपक्रमात ५० हजार रुपयांपर्यंतच्या बक्षिसाची रक्कम मंजूर करण्याचे अधिकार ‘महावितरण’च्या क्षेत्रीय कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले आहेत. तर एक लाखापर्यंतच्या बक्षिसाचे अधिकार अधीक्षक अभियंत्यांना देण्यात आले आहेत. बक्षिसाची रक्कम एक लाखापेक्षा अधिक होत असल्यास ती देण्याचे अधिकार मुख्य अभियंत्यांना असतील. याशिवाय संचालक (दक्षता व सुरक्षा) यांना पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. वीजचोरी कळवणाऱ्याची माहिती गुप्त ठेवण्यात येत असून २० हजार रुपयांपर्यंतची रक्कम रोखीने देण्यात येत आहे. तर त्यावरील पैसे नेटबँकिंगच्या माध्यमातून देण्यात येत आहेत.

- अशी करा तक्रार

महावितरणच्या https://www.mahadiscom.in/report-energy-theft/ या संकेतस्थळावरील लिंकवर "वीजचोरी कळवा आणि लाखो रुपये मिळवा‘ असा विभाग आहे. ते क्लिक केल्यावर "कळवा‘ या शब्दावर क्लिक केल्यानंतर वीज चोराची माहिती भरावी. त्यात संशयिताचे नाव, पत्ता व चोरीची पद्धत लिहायची आहे. त्या खाली स्वत:चे नाव व पत्ता. महावितरणच्या मोबाईल ॲप वरुनही वीजचोरीची माहीती कळविण्यासाठी विशेष लिंक देण्यात आली आहे, खातरजमा केल्यानंतर संबंधित माहिती देणाऱ्याला रोख रकमेचे बक्षीस दिले जाणार आहे.

वीज चोरीची माहीती कळविल्याच्या एका महिन्यानंतर माहीती देणाऱ्यांनी  ०२२-२२६१९१००,२२६१९२०० किंवा २२६१९३०० या क्रमांकावर फ़ोन करून त्यांनी कळविलेल्या वीजचोरीच्या माहीतीवर झालेल्या कार्यवाहीबाबत सविस्तर तपशिल दिल्या जाईल.

Web Title: Report Power Theft, Get Big Reward;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.