वाहतूक पोलिसांची तक्रार करा थेट ‘कॉल सेंटर’मध्ये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 10:34 AM2019-03-27T10:34:23+5:302019-03-27T10:34:50+5:30

कर्तव्यात कसूर करणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलिसांची तात्काळ तक्रार करता यावी, यासाठी आता स्वतंत्र कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे.

Report to the traffic police directly in the 'call center'! | वाहतूक पोलिसांची तक्रार करा थेट ‘कॉल सेंटर’मध्ये!

वाहतूक पोलिसांची तक्रार करा थेट ‘कॉल सेंटर’मध्ये!

Next
ठळक मुद्देउच्च न्यायालयाच्या निर्देशाची अंमलबजावणी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कर्तव्यात कसूर करणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलिसांची तात्काळ तक्रार करता यावी, यासाठी आता स्वतंत्र कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. जनहित याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार, वाहतूक पोलिसांनी ही नवी व्यवस्था केली आहे.
शहरातील अपघाताला आळा घालण्यासाठी तैनात केलेले वाहतूक पोलीस नेमून दिलेल्या सिग्नलवर उभे न राहता दूर आडोशाला उभे राहतात. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये, अपघात होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांची चौकाचौकातील सिग्नलवर तैनाती केली जाते. मात्र, ते चौकाच्या बाजूला आडोशाला उभे राहतात. वाहनचालकाने नियम तोडावे आणि आपण त्याला पकडून त्याच्या खिशाचे माप घ्यावे, असा या पोलिसांचा हेतू असतो. सिग्नलवर पोलीस उभा दिसला तर कोणताही वाहनचालक नियम तोडण्याची हिंमत दाखवत नाही. मात्र, वाहतूक पोलीस सावज हेरण्याच्या उद्देशाने कर्तव्यात कसूर करीत असतात. त्यामुळे अपघात होतात अन् नाहक कुणाला जीवघेणी दुखापत होते. यासंबंधाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. रस्त्यावरील अपघाताला आळा बसावा आणि रस्ता सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी व्हावी, यासंबंधाने दाखल करण्यात आलेल्या या याचिकेवर सुनावणी करताना २० मार्च २०१९ ला उच्च न्यायालयाने तैनातीच्या ठिकाणी गैरहजर राहणाऱ्या किंवा कर्तव्यात कसूर करणाºया वाहतूक पोलिसाची नागरिकांना तात्काळ तक्रार करता यावी यासाठी स्वतंत्र कॉल सेंटर सुरू करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. त्यानुसार पोलीस नियंत्रण कक्षात वाहतूक शाखेच्या पोलिसांसंबंधीच्या तक्रारींसाठी कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्याचा दूरध्वनी क्रमांक ०७१२-२५५५५६६ आणि २५५५५७७ असा आहे.

गुणात्मक बदलाची अपेक्षा
उपराजधानीत एकूण १६१ वाहतूक सिग्नल लावण्यात आले आहेत. त्यातील ८७ वाहतूक सिग्नल चौकात वर्दळीच्या वेळेत १५४ पोलीस कर्मचारी नेमले जातात. तर, सर्वसाधारण वेळेत १११ कर्मचारी नेमले जातात. वाहतूक सुरळीत राहावी, कोणताही अडथळा अथवा अपघात होऊ नये आणि वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करू नये, असा त्यामागचा हेतू असतो. मात्र, वाहतूक शाखेचे पोलीस या हेतूला हरताळ फासतात. यापुढे असे होऊ नये, वाहतूक पोलिसांच्या कर्तव्यात गुणात्मक बदल व्हावा यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रयत्नरत आहेत. कोणत्याही चौकात, सिग्नलवर वाहतूक शाखेचे पोलीस कर्तव्यात कसूर करत असेल, निष्काळजीपणे वागत असेल, व्यवस्थीतपणे आपले कर्तव्य बजावत नसेल तर अशा पोलिसांनी कॉल सेंटरच्या संपर्क क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे.

Web Title: Report to the traffic police directly in the 'call center'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.