रिपब्लिकन फ्रंटचा काँग्रेसला अल्टीमेटम
By admin | Published: January 31, 2017 02:45 AM2017-01-31T02:45:10+5:302017-01-31T02:45:10+5:30
रिपब्लिकन फ्रंट आणि काँग्रेस यांच्यात महापालिका निवडणुकीत जागा वाटपावर चर्चा सुरू होती. परंतु
-तर स्वबळावर लढणार : जोगेंद्र कवाडे यांची माहिती
नागपूर : रिपब्लिकन फ्रंट आणि काँग्रेस यांच्यात महापालिका निवडणुकीत जागा वाटपावर चर्चा सुरू होती. परंतु अचानक फ्रंटमधील एका घटकपक्षाला सोबत घेण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला काय, असा सवाल करीत फ्रंट आणि काँग्रेसच्या युतीसंदर्भात येत्या बुधवारी १ फेब्रुवारीपर्यंतचा अल्टीमेटम फ्रंटचे नेते आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी दिला आहे. १ फेब्रुवारीपर्यंत काँग्रेसकडून प्रतिसाद मिळाला नाही तर रिपब्लिकन फ्रंट स्वबळावर ५२ जागांवर निवडणूक लढेल, असे प्रा. कवाडे यांनी स्पष्ट केले.
रिपाइं (गवई)चे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र्र गवई यांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांना दिलेल्या पत्रामुळे युतीसंदर्भातील बोलणी फिस्कटली असल्याचा संशय निर्माण झाला आहे. रिपाइंच्या दहा गटांची मोट बांधून रिपब्लिकन फ्रंट तयार झाली. विशेष असे की, फ्रंटच्या माध्यमातून रिपब्लिकन शक्ती काँग्रेससोबतच निवडणुकीत दिसणार होती.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीदेखील २७ जानेवारीला राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदेतील निवडणुकीत युतीसंदर्भात स्थानिक नेतृत्वासोबत चर्चेतून निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले होते.
पीपल्स रिपब्लिकन पार्टी, आनंदराज आंबेडकरांची रिपब्लिकन सेना, ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टी (दिलीप जगताप) , रिपब्लिकन पार्टी (एकतावादी/ नाना इंदीसे), खोरिपा (अविनाश कट्टी), खोरिपा(वासुदेव बागडे), खोरिपा(यशवंत तेलंग), खोरिपा(सुनील खोब्रागडे), रिपब्लिकन ऐक्य परिषद सोबत रिपाइं (गवई) आदी गटांतून रिपब्लिकन फ्रंट तयार झाले. ३२ जागांची यादी काँग्रेसकडे दिली. सहा जागा सोडण्यास काँग्रेस तयार झाली. परंतु दहा घटक पक्ष असल्याने किमान १० जागा सोडण्यासंदर्भात विचार करावा येथपर्यंत चर्चा आली होती, असे प्रा. कवाडे म्हणाले. (प्रतिनिधी)
राजेंद्र गवई यांनी विश्वासघात केला
रिपाइंच्या गवईगटाचे नागपूर प्रदेशचे अध्यक्ष प्रकाश कुंभे हे फ्रंटमध्ये मध्यवर्ती भूमिकेत होते. त्यावेळी फ्रंटसंदर्भात डॉ. राजेंद्र गवई यांच्याशी चर्चा केली. फ्रंटसोबत राहण्याचा विश्वास त्यांनी दिला. मध्येच काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरेना फ्रंटमधून बाहेर पडत असल्याचे पत्र देऊन रिपब्लिकन जनतेसोबत त्यांनी विश्वासघात केला. यापूर्वीसुद्धा रिडालोसमधून डॉ. गवई बाहेर पडले होते. रिपब्लिकन चळवळीसोबत विश्वासघात करण्याची परंपरा डॉ. राजेंद्र गवईनी कायम ठेवली आहे, अशी टीका प्रा. कवाडे यांनी केली.