आरक्षणाच्या मागणीला रिपाइंचा नेहमीच पाठिंबा
By Admin | Published: August 30, 2015 02:50 AM2015-08-30T02:50:29+5:302015-08-30T02:50:29+5:30
सामाजिक पाया ढासळू नये : रामदास आठवले यांचे प्रतिपादन
नागपूर : सामाजिकदृष्ट्या व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या समाजातर्फे होणाऱ्या आरक्षणाच्या मागणीला रिपाइंचा नेहमीच पाठिंबा राहिलेला आहे. त्याच धर्तीवर सध्या गुजरातमध्ये आरक्षणासाठी आंदोलन करीत असलेल्या पटेल समाजाला सुद्धा आमचा पाठिंबा आहे. परंतु आरक्षण देत असतांना सामाजिक पाया ढासळता कामा नये, याची काळजी सुद्धा शासनाने घ्यावी, असे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आ) अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.
रविभवन येथे पत्रकारांशी ते बोलत होते. खा. आठवले म्हणाले, पटेल समाजाचे नेतृत्व करीत असलेल्या हार्दिक पटेल यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. मात्र आम्हाला मिळाले नाही तर कुणालाच आरक्षण मिळू नये, ही त्यांची भाषा योग्य नाही. त्याला आमचा प्रखर विरोध राहील. त्यांनी संविधानाची भूमिका मांडावी, असा सल्ला त्यांनी दिला.
नुकतीच जनगणना जाहीर करण्यात आली असून त्यात बौद्धांची संख्या जी दाखविण्यात आली आहे, ती संख्या मुळात खूप जास्त आहे. लोकांमध्ये गैरसमज असल्याने बौद्ध म्हणून नोंद होत नाही. त्यामुळे बौद्धांची संख्या कमी दिसून येते. देशातील दलित आंबेडकरी लोकांनी स्वाभिमानाने बौद्ध म्हणून आपली नोंद करावी, यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दीक्षाभूमी स्मारक समितीत काम करण्याच्या इच्छेबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, दीक्षाभूमीच्या स्मारक समितीत काम करायला निश्चित आवडेल. परंतु या संदर्भात कुणाशीच चर्चा झालेली नाही.
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर दुपारे यांनी रिपाइंत प्रवेश केल्याचे खा. आठवले यांनी जाहीर केले.
यावेळी रिपाइं (आ)चे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, राजू बहादुरे, राजन वाघमारे, बाळू घरडे, भीमराव बनसोड, दादाकांत धनविजय उपस्थित होते. (प्रतिनिधी)