रिपब्लिकन ऐक्यासाठी मंत्रिपद सोडायला तयार
By admin | Published: July 2, 2017 02:34 AM2017-07-02T02:34:24+5:302017-07-02T02:34:24+5:30
प्रकाश आंबेडकरांच्या अध्यक्षतेत हा सत्कार समारंभ होणार म्हणून मी या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले.
रामदास आठवले : भाऊ लोखंडे यांचा अमृत महोत्सवी सत्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रकाश आंबेडकरांच्या अध्यक्षतेत हा सत्कार समारंभ होणार म्हणून मी या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने रिपब्लिकन ऐक्याची चर्चा व्हावी, अशी माझी अपेक्षा होती. परंतु प्रकाश आंबेडकर आले नाहीत, याची खंत वाटते. हा दुरावा संपायला हवा.
रिपब्लिकन ऐक्यासाठी पुढाकार घेतला जाणार असेल तर मी मंत्रिपदही सोडायला तयार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. डॉ. भाऊ लोखंडे अमृत महोत्सवी नागरिक सत्कार समितीच्यावतीने शनिवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांच्या अमृत महोत्सवी सत्कार समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर माजी मंत्री दत्ता मेघे, कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा,आ. जोगेंद्र कवाडे, आ. डॉ. मिलिंद माने, ज्येष्ठ साहित्यिक ताराचंद खांडेकर,ई. मो. नारनवरे,डॉ. अटलबहादूर सिंग,डॉ. गिरीश गांधी व डॉ. नितीन राऊत उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. भाऊ लोखंडे यांचा पाहुण्यांच्या हस्ते शाल,व मानपत्र देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.
भाऊ लोखंडे यांना शुभेच्छा देताना आ. जोगेंद्र कवाडे म्हणाले, भाऊंनी आयुष्यभर लढवय्या बाणा जपला. अनेक संकटे आलीत पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखविलेला स्वाभिमानाचा मार्ग बदलला नाही. भाऊंचा हा सत्कार म्हणजे धम्म चळवळीचा सत्कार आहे. डॉ. वेदप्रकाश मिश्रा म्हणाले, भाऊंचे सामाजिक योगदान अनुकरणीय आहे. आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा निष्ठा गहाण ठेवायची वेळ येते. परंतु अशा प्रसंगातही जो खचत नाही तोच माणूस इतिहास घडवत असतो. भाऊ या वाटेवरचे संघर्षदीप आहेत. दत्ता मेघे यांनीही आपल्या भाषणात डॉ. भाऊ लोखंडे यांच्या संघर्षमय जीवनाचा आढावा घेतला. प्रास्ताविक डॉ. अटलबहादूर सिंग, संचालन डॉ. नितीन राऊत तर आभार डॉ. गिरीश गांधी यांनी मानले.