पतीच्या खुनातील ‘डेंटिस्ट’ पत्नीचा जामीन फेटाळला
By admin | Published: February 21, 2016 02:49 AM2016-02-21T02:49:46+5:302016-02-21T02:49:46+5:30
व्यवसायाने पॅथॉलॉजिस्ट असलेल्या आपल्या पतीचा भोसकून खून केल्याचा आरोप असलेल्या डेंटिस्ट पत्नीचा अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेखर मुनघाटे यांच्या न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला.
सत्र न्यायालय : हुडकेश्वर भागातील प्रकरण
नागपूर : व्यवसायाने पॅथॉलॉजिस्ट असलेल्या आपल्या पतीचा भोसकून खून केल्याचा आरोप असलेल्या डेंटिस्ट पत्नीचा अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेखर मुनघाटे यांच्या न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला.
टिष्ट्वंकल रविकांत उके (४०), असे आरोपी महिलेचे नाव आहे. रविकांत मधुकर उके (४२), असे मृताचे नाव होते.
खुनाची ही घटना २९ नोव्हेंबर २०१५ रोजी रात्री ११.१५ वाजताच्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीरामनगर येथे घडली होती. प्रकरण असे की, रविकांत उके हे बुटीबोरील एका खासगी इस्पितळात पॅथॉलॉजिस्ट होते. त्यामुळे त्यांचे आठवड्यातील पाच दिवसांचे वास्तव्य बुटीबोरीतच असायचे. ते शनिवारी आणि रविवारी नागपुरातील श्रीरामनगर येथील आपल्या घरी मुक्काम करायचे. टिष्ट्वंकल ही देखील व्यवसायाने डेंटिस्ट आहे. पती-पत्नीमध्ये नेहमीच भांडणे व्हायची. घटनेच्या दिवशीही घरगुती कारणावरून या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. परिणामी टिष्ट्वंकलने भाजी कापण्याच्या चाकूने रविकांत यांच्यावर वार करून त्यांचा खून केला होता. बचावासाठी धावलेले आपले वृद्ध सासरे मधुकर रामचंद्र उके यांनाही तिने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती.
आरोपी टिष्ट्वंकल उके हिने जामिनासाठी अर्ज दाखल केला असता सरकार पक्षाने विरोध केला. प्रकरण गंभीर असल्याने आरोपी महिलेचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील मदन सेनाड यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)