ग्रा.पं. निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; ३६१ गटग्रामपंचायतींच्या प्रचार तोफा थंडावल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 11:00 AM2023-11-04T11:00:02+5:302023-11-04T11:01:03+5:30
रविवारी मतदान : सोमवारी मतमोजणी
नागपूर : जिल्ह्यातील ३६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या प्रचार तोफा शुक्रवारी (दि. ३) सायंकाळी थंडावल्या असून, उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटींवर भर दिला आहे. निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी त्यांची राजकीय प्रतीष्ठा पणाला लावली आहे. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे.
निवडणूक हाेत असलेल्या ३६१ गटग्रामपंचायतींमध्ये काटाेल तालुक्यातील ५२, नरखेड २९, सावनेर २६, कळमेश्वर २१, रामटेक २८, पारशिवनी १७, माैदा ३१, कामठी १० उमरेड २६, भिवापूर ३६, कुही २२, नागपूर (ग्रामीण) २४ आणि हिंगणा तालुक्यातील ३९ गटग्रामपंचायतींचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी सरपंचपदाची निवडणूक ही थेट मतदारांमधून हाेत आहे. जिल्ह्यातील बहुतांश गटग्रामपंचायतींमध्ये काँग्रेस व भाजप समर्थित गटांचे सरपंच व सदस्यपदासाठी निवडणूक रिंगणात असून, काही गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) आणि शिवसेना (शिंदे) समर्थित गटांचे उमेदवार रिंगणात आहेत.
या निवडणुका जिंंकण्यासाठी काटाेल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आ. अनिल देशमुख व भाजपचे चरणसिंग ठाकूर, सावनेरमध्ये काँग्रेसचे आ. सुनील केदार व भाजपचे डाॅ. राजीव पाेतदार, हिंगण्यात भाजपचे आमदार समीर मेघे व राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश बंग, कामठीत भाजपचे आ. टेकचंद सावरकर व काँग्रेसचे सुरेश भाेयर, रामटेकमध्ये आ. आशिष जयस्वाल व प्रहारचे रमेश कारामाेरे, उमरेडमध्ये काँग्रेसचे आ. राजू पारवे व भाजपचे माजी आ. सुधीर पारवे यांनी त्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
३६५ ऐवजी ३६१ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक
जिल्ह्यातील ३६५ गटग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. कोंढाळी, बिडगाव आणि नीलडोह ग्रामपंचायतींना नगरपंचायत आणि डिगडोहला नगरपालिकेचा दर्जा प्रदान करण्यात आल्याने ३६५ ऐवजी ३६१ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होत आहेत. या ग्रामपंचायतींमध्ये रविवारी मतदान हाेणार असून, सोमवारी मतमोजणी हाेणार आहे.
दारूच्या वाहतुकीवर पाेलिसांचे लक्ष्य
या निवडणुकीत दारूची मागणी वाढली आहे. त्याअनुषंगाने नागपूर ग्रामीण पाेलिसांनी आधीच माेहफुलाच्या दारूभट्ट्या उद्ध्वस्त करायला सुरुवात केली हाेती. शिवाय, देशी आणि विदेशी दारूच्या अवैध वाहतुकीवरही नागपूर ग्रामीण पाेलिस लक्ष ठेवून असले तरी अंतर्गत ओल्या पार्ट्या सुरूच आहेत.