Coronavirus in Nagpur; कर्मचारी, व्यवसायिकांच्या समुपदेशनासाठी हवी टास्क फोर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 11:30 AM2020-03-26T11:30:12+5:302020-03-26T11:30:35+5:30
नोकरीवर गडांतर येण्याच्या किंवा पगार थांबण्याच्या भीतीने कर्मचाऱ्यांमध्ये मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. अशावेळी मानसिक तणाव निवळण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांचे टास्क फोर्स निर्मिती व शासनाने आर्थिक विश्वास निर्माण करावा, असे मत औद्योगिक मानसोपचार तज्ज्ञ डॉ. वृषाली राऊत यांनी व्यक्त केले.
निशांत वानखेडे
नागपूर : संचारबंदी आणि लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर जीवनावश्यक वस्तू व औषधी दुकाने वगळता लहानमोठी व्यवसायिक प्रतिष्ठाने, कारखाने व सर्वच कंपन्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आलेल्या परिस्थितीमुळे लॉकडाऊन ही आताची गरज आहे. मात्र निर्मिती व विक्री दोन्ही बंद असल्याने एकिकडे व्यवसायिक आणि दुसरीकडे नोकरीवर गडांतर येण्याच्या किंवा पगार थांबण्याच्या भीतीने कर्मचाऱ्यांमध्ये मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. अशावेळी मानसिक तणाव निवळण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांचे टास्क फोर्स निर्मिती व शासनाने आर्थिक विश्वास निर्माण करावा, असे मत औद्योगिक मानसोपचार तज्ज्ञ डॉ. वृषाली राऊत यांनी व्यक्त केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे लहानमोठे कारखाने, दुकाने बंद पडल्याने कामगारांच्या रोजीचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे मोठ्या कंपन्यांचे उद्योजक व त्यातील कर्मचाऱ्यांसमोरही प्रश्न आहे. कंपन्या लॉकडाऊन झाल्याने लाखो कर्मचारी घरी बंद झाले आहेत. अशावेळी कंपन्यांना लाखो, करोडोचे नुकसान होणार असल्याने उद्योजकांची चिंता वाढणे स्वाभाविक आहे. दुसरीकडे या कारणाने आपली नोकरी जाणार किंवा पगार मिळणार नाही, ही भीती कर्मचाºयांमध्येही आहे. अशा स्थितीत मेंदूमध्ये ‘स्ट्रेस हार्मोन्स’ तयार होउन ‘एमीग्डेला हायजॅक’ होण्याची शक्यता आहे. त्यातून तणाव वाढण्याची शक्यता आहे आणि तशी प्रकरणे समोरही येत आहेत. ही स्थिती धोकादायक असते. यामुळे हृदयघात होणे, रक्तदाब (बीपी) व शुगर वाढणे अशी आरोग्याची समस्या निर्माण होते. अशा तणावातून एका मोठ्या कंपनीचा वरिष्ठ अधिकारी हृदयघाताने दगावल्याची माहिती आहे. यालाच ‘पॅनिक अटॅक’ असे म्हटले जाते.
काही कंपन्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ म्हणजे घरून कामाची व्यवस्था केली आहे. ही चांगली बाब असली तरी त्यांच्याकडूनही टार्गेट पूर्ण होण्याची अपेक्षा अधिक आहे. मात्र नेट कनेक्टीव्हिटी व मूलभूत सोयीसुविधांचा अभावामुळे कामावर परिणाम होण्याची, त्यातून कंपनीच्या नफ्यावर फरक पडण्याची व त्यामुळे पुन्हा कर्मचाºयांवर ताण येण्याची शक्यता आहे. याशिवाय घरी असताना वृत्त वाहिन्या आणि सोशल मीडियामधून कोरोना व त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत माहितीचा प्रचंड मारा होत असल्याने वेगळ््या परिणामांना सामोरे जावे लागत आहे. सुविधांचा अभाव, माहितीचा ओव्हरलोड व आर्थिक नुकसान हे तीन मुख्य कारण कर्मचारी व व्यवसायिकांच्या मानसिक तणावाचे कारण ठरत आहे.
युरोप-अमेरिकेमध्ये अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी तणाव व्यवस्थापनाची व्यवस्था आहे जी आपल्या देशात नाही. काही बोगस मानसोपचार तज्ज्ञ याचा फायदा घेत आहेत. त्यामुळे राज्य आणि केंद्र शासनाने नामवंत मानसोपचार तज्ज्ञ, सेवानिवृत्त प्राध्यापक आणि आरसीआयच्या तज्ज्ञांची टीम तयार करावी. तक्रारपेटी आणि हेल्पलाईन क्रमांक जाहीर करून अशा व्यावसायिकांच्या व कर्मचाºयांच्या तक्रारींचे निराकरण व मार्गदर्शन करण्यात यावे, अशी अपेक्षा डॉ. राऊत यांनी व्यक्त केली.
व्यावसायिक, कर्मचाºयांनो सकारात्मक रहा
- प्रत्येकावरच ही परिस्थिती आली आहे याची जाणीव ठेवावी.
- आलेल्या परिस्थितीचा सामना करताना शांत राहणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा तणावपूर्ण विचारांची साखळी तयार होते.
- ७ ते ८ तासाची शांत झोप आवश्यक आहे. यासाठी घरी किमान अर्धा तास व्यायाम करा, मेडिटेशन करा.
- तंबाखूजन्य पदार्थ व मद्यसेवन टाळावे.
- तणाव घालविण्यासाठी सायकॅट्रिक्स औषधांचा अतिवापर टाळावा.
- कुटुंबासोबत वेळ घालवा, तणावाबाबत कुटुंबीयांशी बोला
- लिहून काढा, छंद वाढवा, वाचन करा.
- सर्वात महत्त्वाचे ही परिस्थिती जाईल यावर सकारात्मक विश्वास ठेवा.