नागपुरात कत्तलखान्यातील जनावरांची मुक्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 11:57 PM2019-04-22T23:57:14+5:302019-04-22T23:58:24+5:30
निर्दयपणे कोंबून ठेवण्यात आलेल्या कसायाच्या तावडीतील १३ जनावरांची पाचपावलीत पोलिसांनी मुक्तता केली. एवढेच नव्हे तर चार जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातून १५०० किलो मांसासह १० लाख १० हजारांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला. सोमवारी पहाटे पोलिसांनी ही कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निर्दयपणे कोंबून ठेवण्यात आलेल्या कसायाच्या तावडीतील १३ जनावरांची पाचपावलीत पोलिसांनी मुक्तता केली. एवढेच नव्हे तर चार जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातून १५०० किलो मांसासह १० लाख १० हजारांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला. सोमवारी पहाटे पोलिसांनी ही कारवाई केली.
पाचपावलीतील खंतेनगर नाल्याच्या बाजूला एक जुना कत्तलखाना आहे. तेथे जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती सोमवारी पहाटे पाचपावली पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपावलीचे ठाणेदार अशोक मेश्राम यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सोमवारी पहाटे २.३० च्या सुमारास त्या ठिकाणी छापा मारला. यावेळी एका ट्रकमध्ये १५०० किलो मांस पोलिसांना मिळाले तर, अत्यंत निर्दयपणे बांधून, कोंडून ठेवण्यात आलेली १३ जनावरेही पोलिसांना दिसली. त्यांची मुक्तता करण्यात आली. पोलिसांचा छापा पडल्यानंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेले आरोपी साहिद रजा सिद्दीक हुसेन (वय २३, सक्करदरा), शेख जाबीर शेख जब्बार (वय ३९, रा. चिराग अली चौक, टेका), अलीम खान गफ्फूर खान (वय ४०, रा. यशोधरानगर) आणि मोहम्मद शफी हाजी मोहम्मद शब्बीर (वय ३६, रा. आझादनगर, टेका) या चौघांना अटक करण्यात आली. या चौघांच्या तावडीतून गोमांस, जनावरे आणि ट्रक यासह एकूण १० लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार, सहायक आयुक्त वालचंद्र मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपावलीचे ठाणेदार अशोक मेश्राम यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक संजय जाधव, सहायक निरीक्षक एस. एस. सुरोशे, पोलीस उपनिरीक्षक पी. आर. इंगळे, हवालदार चिंतामण डाखोळे, विलास चव्हाण, रविशंकर मिश्रा, विजय लांडे, सुनील वानखेडे आणि सचिन सोनवणे यांनी ही कामगिरी बजावली.