केंद्रीय लिंबूवर्गीय संस्थेचे संशोधन येतेय फळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 09:06 AM2019-08-18T09:06:09+5:302019-08-18T09:09:59+5:30
केंद्रीय लिंबूवर्गीय संस्थेने संशोधन केलेल्या फळांची चव चाखायला मिळणार आहे.
ऑनलाईन लोकमत
नागपूर : नागपूरकरांनी संत्रा महोत्सवात, अॅग्रोव्हिजनमध्ये केंद्रीय लिंबूवर्गीय संस्थेच्या स्टॉलला भेट देऊन त्यांनी संशोधन केलेल्या फळांची माहिती जाणून घेतली, संस्थेने संशोधन केलेल्या संत्र्याच्या वेगवेगळ्या प्रजातींकडे लोक आकर्षितही झाले. पण त्याची टेस्ट लोकांना चाखायला मिळाली नव्हती. पण लवकरच संस्थेने संशोधन केलेली फळं चाखायला मिळणार आहे.
शहरातील लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेने संत्र्याच्या तीन नव्या प्रजातींचे संशोधन केले आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी या प्रजातींचा नव्या प्रजाती म्हणून स्वीकार केला आहे. यात कटर व्हॅलेन्शिया, फ्लेम ग्रेपफ्रुट आणि एनआरसीसी पुम्मेलो-५ अशी या तीनही प्रजातींची शास्त्रीय नावे आहेत. तीनही प्रजाती बियारहित आहेत. २०१६ साली या प्रजातींवरील संशोधनास सुरुवात झाली. अद्याप या प्रजातींना बाजारात मान्यता मिळालेली नाही. फळाला मान्यता देण्याचा अधिकार हा राज्याच्या प्रजाती मान्य समितीला आहे. कृषी विद्यापीठांनी या प्रजातींना स्वीकारल्यामुळे समितीसुद्धा लवकरच मान्यता देईल, अशी अपेक्षा संस्थेच्या संचालकाना आहे. सध्या संस्थेने येणाऱ्या मोसमासाठी या प्रजातीच्या रोपट्यांची विक्री सुरू केली आहे. यातील कटर व्हॅलेन्शिया हे फळ प्रक्रियेद्वारे तयार करण्यात येणाºया उत्पादनांसाठी महत्त्वाचे मानले जाते. या फळावर सुमारे १० वर्ष संशोधन करण्यात आले. फ्लेम ग्रेपफ्रुट हे बियारहित फळ आहे. तसेच सर्वाधिक रसाळ आहे. याखेरीज एनआरसीसी पुम्पेलो-५ हे फळ अधिक गोड असून याचे वजनसुद्धा अधिक आहे.
आठ महिने संत्रा उपलब्ध होईल
साधारणत: उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये संत्रा बाजारात उपलब्ध होतो. परंतु या तिन्ही प्रजातींना मान्यता मिळाल्यावर आॅक्टोबर ते मे या काळात संत्रा बाजारात उपलब्ध होईल. प्रत्येक प्रजातीचे स्वतंत्र गुणधर्म असल्याने याची लागवड केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते.
- एम.एस. लदानिया, संचालक,
केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था