‘भिवापुरी’ मिरचीच्या उत्पादन वाढीसाठी संशोधन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 10:32 AM2019-01-14T10:32:21+5:302019-01-14T10:33:57+5:30
भिवापुरी मिरचीसह आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध जी-४ मिरचीचे उत्पादन व क्षेत्र वाढविण्यासंबंधात दोन्ही राज्यातील कृषी विद्यापीठांतर्गत करार करण्यात आला आहे. यादृष्टीने जोमाने काम सुरू असून येत्या दोन-तीन वर्षात याचे परिणाम दिसून येतील.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भातील भिवापुरी मिरचीला जगात मान्यता आहे. परंतु पारंपरिक लागवड आणि कीड रोगामुळे मिरचीचे उत्पादन व क्षेत्र दिवसेंदिवस घटत चालले आहे. यावर शासन व कृषी शास्त्रज्ञ गंभीर असून भिवापुरी मिरचीसह आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध जी-४ मिरचीचे उत्पादन व क्षेत्र वाढविण्यासंबंधात दोन्ही राज्यातील कृषी विद्यापीठांतर्गत करार करण्यात आला आहे. यादृष्टीने जोमाने काम सुरू असून येत्या दोन-तीन वर्षात याचे परिणाम दिसून येतील.
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या फलोत्पादन विभागातील सहयोगी प्राध्यापक एस.एम. घावडे यांनी याबाबत माहिती दिली. कृषी जिल्हा महोत्सवांतर्गत मिरची विक्री व व्यवस्थापन यावर ते मार्गदर्शन करीत होते. प्रा. घावडे यांनी सांगितले की, भिवापुरी मिरची ही जगप्रसिद्ध आहे. त्याचप्रकारे आंध्र प्रदेशातील गुंटूर हे क्षेत्र संपूर्ण मिरचीचे क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. जी-४ नावाने तेथील मिरची ओळखली जाते. काही वर्षांपासून रोगामुळे आणि पारंपरिक पद्धतीने लागवड होत असल्याने मिरचीचे क्षेत्र घटत चालले आहे. त्यामुळे उत्पादनही कमी होत आहे. याला शासनासह कृषी शास्त्रज्ञांनीही गांभीर्याने घेतले असून, मिरचीची आधुनिक पद्धतीने लागवड व्हावी आणि शेतकऱ्यांना मिरचीचे नवीन वाण व तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे म्हणून वाराणसी येथील शासनाची प्रसिद्ध संशोधन संस्था आॅल इंडिया को-आॅर्डिनेटर रिसर्च प्रोजेक्टच्या माध्यमातून गुंटूर आंध्र प्रदेश आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्यात एक करार करण्यात आला आहे. या करारांतर्गत भिवापुरी मिरचीसोबतच अचलपुरी, जयंती या मिरचीचे आणि गुंटूर येथील जी-४ या मिरचीचे उत्पादन, क्षेत्र वाढविण्याबाबत दोन्ही विद्यापीठांमध्ये संशोधन सुरू आहे. दोन ते तीन वर्षात त्याचे परिणाम पुढे येतील.
वायगाव हळद जगात विख्यात
वायगाव हळदबाबत मार्गदर्शन करताना प्रा. घावडे यांनी सांगितले की, वायगाव हळदीने जगात आपले स्थान पक्के केले आहे. त्याचे कारण म्हणजे यात असलेल्या ‘कुरकमीन’ हा पदार्थ होय. हळदीचा स्वाद आणि रंग हे कुरकमीन या पदार्थामुळे ठरते. या रंग व स्वादामुळेच त्याला जगात मागणी आहे. सेंद्रिय पद्धतीने हळद लागवड केल्यास कुरकमीन पदार्थाचे प्रमाण वाढू शकते, असे घावडे यांनी स्पष्ट केले.