नागपुरातील ‘व्हीएनआयटी’ करणार खड्ड्यांवर संशोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 10:55 AM2018-09-04T10:55:46+5:302018-09-04T10:59:02+5:30
खड्ड्यांमुळे नागपुरातील नागरिकांना किती प्रमाणात आर्थिक व आरोग्याच्या दृष्टीने नुकसान सहन करावे लागले यावर ‘व्हीएनआयटी’कडून (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) सखोल अभ्यास करण्यात येणार आहे.
आशिष दुबे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खड्डे आणि आर्थिक नुकसान ! वाचून थोडेसे आश्चर्य वाटेल व खरोखर खड्ड्यांमुळे आर्थिक फटका बसू शकतो का असा विचार डोक्यात येईल. मात्र खरोखर खड्ड्यांमुळे नागपुरातील नागरिकांना किती प्रमाणात आर्थिक व आरोग्याच्या दृष्टीने नुकसान सहन करावे लागले यावर वैज्ञानिक संशोधन होणार आहे. ‘व्हीएनआयटी’कडून (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) याबाबतीत सखोल अभ्यास करण्यात येणार आहे. या अभ्यासातून मनपा, नासुप्र व जिल्हा प्रशासनाची खड्डेपुराणात नेमकी भूमिका काय होती व नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी किती प्रामाणिकता दाखविली ही बाबदेखील समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
नागपुरात रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण वेगाने सुरू असले तरी दुसरीकडे अनेक डांबरी रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्यांत खड्डे की खड्ड्यात रस्ते असे चित्र अनेक ठिकाणी दिसून येते. यावरच सखोल अभ्यासासाठी ‘व्हीएनआयटी’च्या ‘सिव्हिल इंजिनिअरींग’ विभागाने पुढाकार घेतला आहे. विभागातील प्रोफेसर विश्रृत लांडगे यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांचे पथक शहरातील विविध भागांमध्ये जाऊन तेथे पाऊस व अन्य कारणांमुळे रस्त्यांवर झालेल्या खड्ड्यांचे अध्ययन करतील. खराब रस्ते व खड्ड्यांमुळे सामान्य जनतेला व सरकारला किती नुकसान झाले हा अभ्यासाचा मुख्य मुद्दा राहणार आहे. खराब रस्ते व खड्ड्यांमुळे किती वाहने खराब झाली, अपघात झाले यावरदेखील अभ्यास करण्यात येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अगोदर किती खड्डे होते व आता किती खड्डे आहेत आणि खड्ड्यांना खरोखरच तांत्रिकदृष्ट्यादुरुस्त करण्यात आले आहे का याची चाचपणीदेखील करण्यात येईल.
याबाबत डॉ.लांडगे यांना संपर्क केला असता त्यांनी या वृत्ताला होकार दिला. मात्र अभ्यास नेमका कशा पद्धतीने होईल, याबाबत माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. हा अभ्यास १५ ते २० दिवस चालेल व सखोल संशोधनानंतर अहवाल तयार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
प्रशासन अहवाल स्वीकारणार का ?
मनपा, नासुप्र व जिल्हा प्रशासनाकडून खराब रस्ते व खड्डे दुरुस्तीचे दावे करण्यात येत आहे. नेमक्या याच कालावधीत ‘व्हीएनआयटी’कडून संशोधन होणार असल्याने दाव्यांमध्ये नेमके किती तथ्य आहे हे स्पष्ट होणार आहे. मात्र ‘व्हीएनआयटी’चा जो अहवाल असेल, त्याला प्रशासन प्रामाणिकपणे स्विकारेल की नाही, हा प्रश्न कायम आहे. सरकार व प्रशासन यांना मदत व्हावी याच उद्देशातून हे संशोधन करण्यात येणार आहे, असे डॉ.लांडगे यांनी सांगितले.