होमिओपॅथीमधील क्षमता सिद्ध करण्यास संशोधन आवश्यक; ‘अखिल भारतीय होमिओपॅथी रिसर्च समिट’ला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2023 10:16 PM2023-03-18T22:16:47+5:302023-03-18T22:17:16+5:30
Nagpur News आतापर्यंत होमिओपॅथीमध्ये जवळपास २० टक्केच संशोधन झाले, ते वाढविणे आवश्यक आहे, असे मत एमडी मेडिसिनसह होमिओपॅथी तज्ज्ञ असलेले डॉ. जसवंत पाटील यांनी व्यक्त केले.
नागपूर : होमिओपॅथीमध्ये गंभीरातील गंभीर आजार बरे करण्याची क्षमता आहे. ती सिद्ध करण्यासाठी संशोधनाची गरज आहे. आतापर्यंत होमिओपॅथीमध्ये जवळपास २० टक्केच संशोधन झाले, ते वाढविणे आवश्यक आहे, असे मत एमडी मेडिसिनसह होमिओपॅथी तज्ज्ञ असलेले डॉ. जसवंत पाटील यांनी व्यक्त केले.
सुरेश भट सभागृहात शनिवारपासून दोन दिवसीय ‘अखिल भारतीय होमिओपॅथी रिसर्च समिट’ला सुरुवात झाली. यादरम्यान ते ‘लोकमत’शी बोलत होते. ‘समिट’चे उद्घाटन माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते झाले. डॉ. पाटील म्हणाले, ज्या रुग्णांवर ॲलोपॅथी उपचारात मर्यादा येत होत्या त्यांच्यावर पुढील उपचारासाठी साडेचार वर्षे होमिओपॅथीचा अभ्यास केला. ‘ऑब्झर्व्हेशन रिसर्च’मधून कॅन्सरसह, हिमोफे लिआ, हृदयविकाराचा झटका आलेले, कोविडच्या गंभीर रुग्णांवर होमिओपॅथीने उपचार करून त्यांचे जीव वाचविले. होमिओपॅथीला पुढे नेण्यासाठी संशोधनाची व त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. या समिटमध्ये २५०० होमिओपॅथी तज्ज्ञ, एमडीचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. नितेश दुबे हे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक असून, नागपूरचे डॉ. राजेश मुरकुटे, डॉ. मनीष पाटील, डॉ. रवी वैरागडे हे आयोजन समितीत आहेत.
यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला दिलेल्या रुग्णांना केले बरे
केरळमधील डॉ. एस. जी. बिजू यांनी सांगितले, यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला दिलेल्या रुग्णांना होमिओपॅथीच्या उपचाराने बरे केले. ‘हिपॅटायटीस-बी’, वंध्यत्व, ल्युकेमिया यासारख्या अनेक आजारांवर होमिओपॅथीने उपचार केले आणि रुग्ण बरे झाले. याचे डाक्युमेंटेशन आहे. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून संधिवात, वंध्यत्व आणि ॲलर्जीच्या आजारांवरील उपचारांवर संशोधन करत आहोत, असेही ते म्हणाले.
‘अर्थरायटिस’वर होमिओपॅथीमध्ये संशोधन गरजेचे
कोलकाता येथील डॉ. अनिर्बन सुकुल म्हणाले, शरीरातील सांधे, स्नायू यांच्यावर विविध कारणांनी येणारी सूज व त्यामुळे होणारा त्रास म्हणजे वातरोग (अर्थरायटिस). होमिओपॅथीमध्ये या रोगावर प्रभावी उपचार आहेत. याची लक्षणे कमी करता येऊ शकतात. या रोगावरील उपचारासाठी अनेक रुग्ण होमिओपॅथीकडे वळत आहेत. यात आणखी संशोधन होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. नागपूरचे डॉ. आदिल चिमथनवाला, मुंबईचे डॉ. मयुरेश महाजन यांनी होमिओपॅथीमधून बरे झालेल्या गंभीर रुग्णांची प्रकरणे सादर केली.