चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या दिशेने संशोधन व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:09 AM2021-09-27T04:09:21+5:302021-09-27T04:09:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विज्ञान जगतात बदल हीच संकल्पना शाश्वत आहे. तंत्रज्ञानात वेगाने बदल होत असून, चौथ्या औद्योगिक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विज्ञान जगतात बदल हीच संकल्पना शाश्वत आहे. तंत्रज्ञानात वेगाने बदल होत असून, चौथ्या औद्योगिक क्रांतीकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. ‘सीएसआयआर-नीरी’ने या क्रांतीच्या दिशेने त्याची आव्हाने व संधी लक्षात घेऊन संशोधन केले पाहिजे, असे मत जवाहरलाल नेहरू ॲल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंटचे संचालक डॉ. अनुपम अग्निहोत्री यांनी व्यक्त केले. ‘नीरी’च्या ८०व्या स्थापनादिनानिमित्त रविवारी आयोजित ‘ऑनलाइन’ कार्यक्रमादरम्यान ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते.
यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. शरद निंबाळकर, वरिष्ठ संशोधक डॉ. अतुल वैद्य, मुख्य संशोधक डॉ.जी. एल. बोधे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. ‘नीरी’ने उद्योगक्षेत्रासोबत काम केल्याने देशाचा फायदा झाला आहे. अनेक उद्योगसमूह काळानुसार बदलले नाही व त्यामुळे ते बंद झाले. कुठल्याही संशोधन संस्थेत तंत्रज्ञान बदल व्हायलाच हवेत. भारताने बदल स्वीकारल्यामुळे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये देशाने सहा वर्षात ८१ वरून ४६व्या क्रमांकावर झेप घेतली, अशी माहिती डॉ.अग्निहोत्री यांनी दिली. नावीन्यपूर्ण संशोधनामुळे मागील दशकात शहरांमधील राहणीमानात बराच फरक पडला आहे. मात्र ग्रामीण भागातील लोकांच्या मूलभूत समस्या कायम आहे. वैज्ञानिकांनी ग्रामीण भारत डोळ्यासमोर ठेवून संशोधन करायला हवे. ‘नीरी’कडून यात मौलिक योगदान दिले जाऊ शकते, असे प्रतिपादन डॉ. निंबाळकर यांनी केले. डॉ.वैद्य यांनी ‘सीएसआयआर-नीरी’च्या कामगिरीवर प्रास्ताविकातून प्रकाश टाकला. ‘नीरी’ला ग्रीन क्रॅकर्ससाठी तंत्रज्ञान पुरस्कार मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. डॉ. बोधे यांनी मुख्य वक्त्यांचा परिचय करून दिला तर प्रकाश कुंभारे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. ‘नीरी’च्या वार्षिक अहवालाचेदेखील यावेळी प्रकाशन झाले.
विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रश्नमंजूषेचे आयोजन
‘नीरी’च्या स्थापना दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी देशपातळीवरील विज्ञान प्रश्नमंजूषेचे आयोजन करण्यात आले होते. ऑनलाइन माध्यमातून हे आयोजन झाले व यात ४१२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.