नागपुरात वीज दरवाढीच्या प्रस्तावावर आक्रोश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 12:10 AM2018-08-08T00:10:04+5:302018-08-08T00:11:56+5:30
वीज दरवाढीला विरोध करीत महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या जनसुनावणीदरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला. ‘आयोग गो बॅक’, ‘महावितरण मुर्दाबाद’चे नारे लावून आक्रोश व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वीज दरवाढीला विरोध करीत महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या जनसुनावणीदरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला. ‘आयोग गो बॅक’, ‘महावितरण मुर्दाबाद’चे नारे लावून आक्रोश व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी दरवाढीबाबत दाखल केलेली याचिका तातडीने रद्द करण्याची मागणी लावून धरली. शेवटी पोलिसांनी अंदोलकांना ताब्यात घेत सभागृहाबाहेर काढले. वाढता गोंधळ पाहून जनसुनावणी २० मिनिटे थांबविण्यात आली होती.
महावितरणने ३४६४६ कोटी रुपयांचे महसूल तोट्याचा हवाला देत याच्या भरपाईसाठी वीजदरात वाढ करण्यासाठी विद्युत नियामक आयोगाला परवानगी मागितली आहे. नियामक आयोग राज्याच्या प्रत्येक विभागीय कार्यालयात जनसुनावणी घेऊन जनतेच्या मनात काय आहे, याचा मागोवा घेतला जात आहे. सोमवारी अमरावतीमध्ये झालेल्या जनसुनावणीनंतर आयोगाने मंगळवारी नागपुरातील वनामती सभागृहात जनसुनावणीचे आयोजन केले होते. सकाळी १० वाजता याला सुरुवात होताच युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सभागृहात धडकले. लोकांचे मत जाणून घेण्यासाठी आयोगाचे सचिव अभिजित देशपांडे, सदस्य आय. एम. बोहरी व मुकेश खुल्लर उपस्थित होते. महावितरणचे संचालक सतीश चव्हाण यांनी, विजेची दरवाढ का, हे सांगायला सुरुवात करताच काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे पाटील हे आपल्या समर्थकांसह पोहचले. सभागृहात उपस्थित युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नारेबाजीला सुरुवात केली. सभागृहातील सुरक्षा रक्षकांनी कार्यकर्त्यांना व्यासपीठाकडे जाण्यापासून थांबविले. यामुळे गोंधळ आणखी वाढला. या गोंधळात आयोगाचे सदस्य उठून निघून गेले. साधारण २० मिनिटांपर्यंत हा गोंधळ सुरू होता.
या दरम्यान अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना व्यासपीठाच्या समक्ष आपल्या सूचना मांडण्याचा सल्ला दिला. देशपांडे यांनी संयम ठेवून आयोगाला सहकार्य करण्याचे आवाहनही केले. त्यानंतर सुनावणीला सुरुवात झाली. या वेळी प्रफुल्ल गुडधे यांनी वितरण हानी कमी झाली असतानाही दरवाढ का, असा सवाल करीत जनसुनावणीलाच अवैध ठरविले. विना अध्यक्षांच्या उपस्थितीत आयोग जनतेचे मत ऐकूच शकत नाही, असेही त्यांनी सांगितले. देशपांडे यांना लक्ष्य करीत ते म्हणाले, मागील सुनावणीच्या दरम्यान देशपांडे यांनी महावितरणाच्यावतीने दरवाढीची याचिका दाखल केली होती. अशावेळी आयोगाच्या सचिवाच्या रूपात त्यांच्याकडून न्यायाची कशी अपेक्षा केली जाऊ शकते. काँग्रेस कार्यकर्त्यांनी याला घेऊन पुन्हा गोंधळ घातला. अखेर सुरक्षा रक्षकांनी त्यांना ताब्यात घेतले व सभागृहाबाहेर काढले.