एससींच्या विकासासाठी आरक्षण महत्त्वाचे : सुखदेव थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 11:50 PM2019-01-05T23:50:49+5:302019-01-05T23:59:19+5:30
शिक्षण घेऊनही बाजारात नोकरी मागण्यासाठी गेलेल्या एससी विद्यार्थ्यांना जातीय आधारावर नोकरी नाकारली जाते. जात, वंश, धर्माच्या आधारावर ज्यांना संधी नाकारल्या जातात, अशांसाठी आरक्षण हे विकासाचे शस्त्र आहे. परंतु उच्चशिक्षित झाल्यानंतर जे शैक्षणिक शुल्क भरू शकतात, त्यांचे आरक्षण कायम ठेवून त्यांना सवलत देऊ नये, असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात यांनी आज येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिक्षण घेऊनही बाजारात नोकरी मागण्यासाठी गेलेल्या एससी विद्यार्थ्यांना जातीय आधारावर नोकरी नाकारली जाते. जात, वंश, धर्माच्या आधारावर ज्यांना संधी नाकारल्या जातात, अशांसाठी आरक्षण हे विकासाचे शस्त्र आहे. परंतु उच्चशिक्षित झाल्यानंतर जे शैक्षणिक शुल्क भरू शकतात, त्यांचे आरक्षण कायम ठेवून त्यांना सवलत देऊ नये, असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात यांनी आज येथे केले.
धरमपेठ येथील वनामतीच्या सभागृहात आयोजित जागतिक मराठी संमेलनात प्रगट मुलाखतीत ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार शैलेश पांडे, ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे यांनी डॉ. थोरात यांची प्रगट मुलाखत घेऊन त्यांना बोलते केले. विविध प्रश्नांना उत्तरे देताना डॉ. थोरात म्हणाले, लोकांच्या मताने लोक प्रतिनिधी निवडून येत असल्यामुळे लोकशाहीची घसरण झाली नाही. परंतु वैचारिकतेत, धर्मनिरपेक्षतेतही घसरण झाली आहे. प्रत्येकाला मूलभूत अधिकार आहेत. परंतु काही राज्यात धर्माच्या आधारावर सत्ता स्थापन होत असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, शासनाचे एससी, एसटीबाबतचे धोरण बदलल्यामुळे दलितात असुरक्षिततेची भावना वाढली आहे. राज्यात अॅट्रॉसिटीची प्रकरणे वाढली आहेत. मागील पाच वर्षाच्या अर्थसंकल्पात त्यांच्यासाठी योग्य ती तरतूद न केल्यामुळे त्याचा विकासावर परिणाम झाला आहे. सरपंच थेट जनतेतून निवडून देण्यात येत असल्यामुळे एससींचा मार्ग बंद झाला आहे. विकास हा गरिबापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. दारिद्र्य संपेल असा विकास व्हावा. शेती, उद्योगधंद्यांचे उत्पन्न वाढावे, पण त्यासोबतच गरिबांचेही उत्पन्न वाढण्याची गरज आहे. महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न अधिक आहे. परंतु गरिबीत महाराष्ट्र ११ व्या क्रमांकावर असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शिक्षणाच्या खासगीकरणावर प्रकाश टाकताना ते म्हणाले, शिक्षणाच्या खासगीकरणामुळे शैक्षणिक विषमता वाढून त्याचा परिणाम रोजगारावर होईल. शासकीय कार्यालयात कंत्राटी पद्धतीने भरती होत असून खासगी कंपन्यातही आरक्षण मिळत नसल्यामुळे एससींच्या विकासावर त्याचा परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.
आंबेडकरी चळवळीतील गटबाजी धोकादायक
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन करून महाडचा सत्याग्रह केला. काळाराम मंदिरात प्रवेश मिळविला. पुढे त्यांनी उभारलेल्या चळवळीचे गटातटात विभाजन झाले.एससींच्या समस्या गंभीर आहेत. त्यामुळे या विभाजनाची त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा डॉ. थोरात यांनी दिला.