पूर्व नागपुरातील भूखंडांचे आरक्षण रद्द
By admin | Published: May 16, 2016 03:01 AM2016-05-16T03:01:43+5:302016-05-16T03:01:43+5:30
पूर्व नागपुरातील बरेच भूखंड वाणिज्यिक (कमर्शिअल), होलसेल मार्केट व प्राथमिक शाळेसाठी ठेवण्यात आलेल्या आरक्षणांमुळे बाधित होते.
कृष्णा खोपडे यांच्या प्रयत्नांना यश : ३००० भूखंडधारकांना दिलासा
नागपूर : पूर्व नागपुरातील बरेच भूखंड वाणिज्यिक (कमर्शिअल), होलसेल मार्केट व प्राथमिक शाळेसाठी ठेवण्यात आलेल्या आरक्षणांमुळे बाधित होते. संबंधित आरक्षणे हटविण्यात यावी, यासाठी आमदार कृष्णा खोपडे यांनी राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा केला. शेवटी राज्य सरकारने संबंधित आरक्षणे रद्द केली आहेत. याचा फायदा पूर्व नागपुरातील मौजा भरतवाडा व मौजा हरपूर येथील सुमारे तीन हजार भूखंडधारकांना होणार आहे.
पूर्व नागपुरातील हजारो भूखंड विविध आरक्षणाने बाधित आहेत. बहुतांश आरक्षित भूखंडांवर नागरिकांनी बांधकामे केली आहेत. भूखंड आरक्षित असल्यामुळे नागरिकांना या भूखंडांची खरेदी- विक्री करता येत नव्हती. शिवाय घर बांधण्यासाठी बँकेकडून कर्जही मिळत नव्हते. या परिसराच्या विकासावरही याचा परिणाम झाला होता. गेल्या २५ वर्षांपासून येथील नागरिक आरक्षण वगळण्याची मागणी करीत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय गांभीर्याने घेतला व हजारो नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेतला.
आरक्षण वगळल्यामुळे मौजा भरतवाडा येथील विवेकानंद मिशन को-आॅप हा. सोसायटी, धनलक्ष्मी को-आॅप हा. सोसायटी, शिवनेरी को-आॅप हा. सोसायटी, साईनगर को-आॅप हा. सोसायटी, पुष्पक साईनगर को-आॅप हा. सोसायटी, मालिक मकबुजा, शिवाजीनगर भाडेकरू, गांधीकुटी गृहनिर्माण सहकारी संस्था, महादेवनगर गृहनिर्माण सहकारी संस्था, धनलक्ष्मी को-आॅप हा. सोसायटी, मंगळवारी को-आॅप हा. सोसायटी, नरहरी गृहनिर्माण संस्था तसेच मौजा हरपूर येथील जीवनोदय हाऊसिंग सोसायटीचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
विकासाचा मार्ग मोकळा
नागपूर शहरातील भूखंडांच्या आरक्षणाचे विषय गेल्या अनेक वर्षांपासून राजकीयदृष्ट्या प्रलंबित होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टप्प्याटप्प्याने सर्व आरक्षणांना मुक्त करून भूखंडधारकांना मोठा न्याय मिळवून दिला आहे. आरक्षण वगळल्यामुळे या भागात विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
- आ. कृष्णा खोपडे