खासगीकरणामुळे आरक्षण संकटात

By admin | Published: March 19, 2017 02:58 AM2017-03-19T02:58:41+5:302017-03-19T02:58:41+5:30

जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र असलेल्या भारतात गेल्या काही काळापासून आर्थिक, सामाजिक दरी वाढत आहे.

Reservation problems due to privatization due to privatization | खासगीकरणामुळे आरक्षण संकटात

खासगीकरणामुळे आरक्षण संकटात

Next

सीताराम येचुरी : वाढती विषमता लोकशाहीसाठी घातक
नागपूर : जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र असलेल्या भारतात गेल्या काही काळापासून आर्थिक, सामाजिक दरी वाढत आहे. ही वाढती विषमता लोकशाहीसाठी घातक आहे. देशातील अनेक क्षेत्रांत वेगाने खासगीकरण होत आहेत. यामुळे आरक्षणामुळे मिळणाऱ्या संधींचे प्रमाण कमी होत असून, आरक्षणच संकटात सापडले आहे, असे मत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस व खासदार सीताराम येचुरी यांनी व्यक्त केले. दीक्षाभूमी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील इतिहास विभागातर्फे आयोजित ‘लोकशाहीचा ऱ्हास : आव्हाने व उपाय’ या विषयावरील व्याख्यानादरम्यान ते शनिवारी बोलत होते.
महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.सी.पवार, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ.गौतम कांबळे, इतिहास विभागप्रमुख डॉ.अविनाश फुलझेले प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून देशातील प्रत्येक नागरिकाला आर्थिक, सामाजिक व राजकीय समानता दिली.मात्र २०१४ पासून दलितांवर अत्याचाराचे प्रमाण वाढीस लागले आहे. शासनाच्या आर्थिक धोरणांमुळे गरीब आणखी गरीब होत आहेत, तर श्रीमंत आणखी धनाढ्य होत आहेत. देशातील १ टक्के जनतेच्या हाती ‘जीडीपी’च्या ५८.४ टक्के पैसा आहे. अशा स्थितीत लोकशाहीसमोरील सर्वात मोठे आव्हान ही विषमता दूर करणे हेच आहे. समाजातील ही विषमता व अंतर्विरोध दूर झाला नाही, तर लोकशाहीचे स्तंभ कमकुवत होतील, असे येचुरी म्हणाले.
धर्म, जातीच्या आधारावर समाजात भेदभाव निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत.
शिवाय हिंदुत्ववादी राष्ट्रीयत्वाच्या माध्यमातून भारतीय राष्ट्रीयत्वाची भावना असलेल्यांना चुकीचे ठरविण्यात येत आहे. विविधतेत एकता ही देशाची ओळख आहे, तिला जपणे आवश्यक आहे. यासाठी ज्याप्रमाणे देशाच्या सीमेवर सैनिक लढतात, त्याच प्रमाणे नागरिकांनीदेखील सारासार विवेकबुद्धी वापरुन विषमतेविरोधात लढा दिला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ.गौतम कांबळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ.फुलझेले यांनी संचालन केले तर विद्या चोरपगार यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)

गोरक्षकांवर टीका
यावेळी येचुरी यांनी गोरक्षेच्या नावाखाली कायदा हातात घेणाऱ्यांवर जोरदार टीका केली. देशातील अनेक राज्यांत गोहत्याबंदीचा कायदा आहे. जर या कायद्याचे कुणी उल्लंघन केले तर कायदा व सुव्यवस्था पावले उचलण्यास सक्षम आहे. मात्र याविरोधात थेट कायदा हाती घेण्याचा गोरक्षकांना अधिकार कुणी दिला, असा प्रश्न येचुरी यांनी उपस्थित केला.
दीक्षाभूमी माझ्यासाठी तीर्थक्षेत्रच
सीताराम येचुरी यांनी कार्यक्रमाअगोदर दीक्षाभूमीला भेट देऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थींचे दर्शन घेतले. शांती व अहिंसेचा संदेश देणाऱ्या बुद्ध धम्मात बाबासाहेबांनी प्रवेश केला व ही भूमी पवित्र झाली. समानतेचे प्रतीक असलेली ही दीक्षाभूमी माझ्यासाठी तीर्थक्षेत्रच असून येथे आल्यानंतर मला समाधान वाटत असल्याचे मत येचुरी यांनी व्यक्त केले.

कडेकोट सुरक्षाव्यवस्था
विद्यापीठातील स्थगित झालेला कार्यक्रम व त्यावरुन निर्माण झालेला वाद यामुळे या व्याख्यानाची बरीच चर्चा झाली होती. कार्यक्रमाला प्रचंड संख्येत नागरिक उपस्थित होते. अखेर सभागृहाबाहेर महाविद्यालयाच्या प्रांगणात ‘स्क्रीन’ लावावा लागला. तसेच संपूर्ण परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.
केरळमधील हिंसाचाराची कारणे शोधावी
केरळमध्ये सत्तारूढ माकप सरकार सत्तेत आल्यापासून राजकीय हिंसाचार वाढला असल्याचा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे करण्यात आला. यावर येचुरी यांना विचारणा केली असता त्यांनी तेथील सरकारची पाठराखण केली. या हिंसाचारात आमचेही सात लोक मारल्या गेलेत. केरळमध्ये हिंसाचाराच्या घटना का घडल्यात याचा विचार करणे आणि त्याची कारणे शोधणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

विमानतळावर भव्य स्वागत
कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार सीताराम येचुरी यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांसह आंबेडकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून भव्य स्वागत केले. येचुरी यांचे विमान ४.२० वाजता येणार होते. परंतु कार्यकर्ते ३.३० वाजेपासूनच विमानतळावर जमले होते. ५.४५ वाजता येचुरी विमानतळातून बाहेर पडले. त्यांना पाहताच लाल सलाम आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. खा. येचुरी यांनी सुद्धा हात उंचावून कार्यकर्त्यांचे स्वागत स्वीकारले. काही महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी खास लाल रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या. विमानतळावर अरुण वनकर, मनोहर मुळे, श्याम काळे, राजेंद्र साठे, मधुकर भरणे, अनिल नगरारे, अरुण साखरकर, अमृत मेश्राम, चंदा मेंढे, सविता पासोळे, दिनेश अंडरसहारे, संजय भोरे, अमन कांबळे, प्रीतम बुलकुंडे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Web Title: Reservation problems due to privatization due to privatization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.