फ्रंट वर्करसाठी मनपा रुग्णालयात बेड राखीव ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:07 AM2021-04-26T04:07:44+5:302021-04-26T04:07:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महापालिका कर्मचारी,शिक्षक, सफाई कामगार,आरोग्य विभागातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महापालिका कर्मचारी,शिक्षक, सफाई कामगार,आरोग्य विभागातील डॉक्टर , नर्स व आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर कुठलीही तक्रार न करता प्रशासनाने दिलेली जबाबदारी पार पाडत आहेत. काम करताना मोठ्या प्रमाणात कर्मचारी, शिक्षक, सफाई कामगार बाधित होत आहेत. बाधितांना उपचार मिळावेत यासाठी मनपाने आयसोलेशन व इंदिरा गांधी रुग्णालय येथे प्रत्येकी १० बेड राखीव ठेवावेत, अशी मागणी राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लाॅईज असोसिएशन (इंटक) ने केली आहे. मनपा कर्मचारी, शिक्षक ,सफाई कामगार व इतर कर्मचारी कोरोनाबाधित झाल्यास वा कुटुंबातील व्यक्ती बाधित झाल्यास त्यांच्या उपचाराची प्रशासनाने काहीच सुविधा केलेली नाही. बाधित झाल्यास उपचारासाठी वणवण भटकावे लागत आहे. फ्रंट वर्करला उपचार मिळत नसेल तर कामे कशी करणार. यासंदर्भात संघटनेकडे दररोज तक्रारी येत आहेत. सर्व कर्मचारी,शिक्षक ,सफाई कामगार त्रस्त आहेत. त्यांना खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणे शक्य नाही त्यामुळे मनपाने सर्व सुविधायुक्त बेड मनपा कर्मचारी व शिक्षकांसाठी राखीव ठेवावेत, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे, रंजन नलोडे, प्रवीण तंत्रपाळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली आहे.