पोलिस दलात फेरबदलाच्या हालचाली; नागपूरला मिळणार नवीन आयुक्त?

By योगेश पांडे | Published: December 11, 2023 10:14 PM2023-12-11T22:14:11+5:302023-12-11T22:15:02+5:30

वर्षअखेरीस किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला नागपूरला नवीन पोलिस आयुक्त मिळणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

reshuffle movements in the police force nagpur will get a new commissioner | पोलिस दलात फेरबदलाच्या हालचाली; नागपूरला मिळणार नवीन आयुक्त?

पोलिस दलात फेरबदलाच्या हालचाली; नागपूरला मिळणार नवीन आयुक्त?

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : ठाण्यातील पोलिस आयुक्तांच्या बदलीनंतर आता नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या बदलीच्या चर्चांना उधाण आले आहे. गृह विभागातील सूत्रांनुसार राज्यातील इतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्यादेखील लवकरच बदल्या होण्याची शक्यता आहे. वर्षअखेरीस किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला नागपूरला नवीन पोलिस आयुक्त मिळणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

गृह विभागाने सोमवारी ठाणे पोलिस आयुक्त जयजीत सिंग यांची बदली केली व त्यांच्या जागी आशुतोष डुंबरे यांची नियुक्ती केली आहे. आता राज्यातील इतरही काही आयुक्तांची बदली होण्याची हालचाल सुरू झाली आहे. विधीमंडळ अधिवेशन संपल्यानंतर ही घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार हे सप्टेंबर २०२० रोजी नागपुरात रुजू झाले होते. नागपूरच्या इतिहासात सर्वाधिक काळ पोलिस आयुक्तपदी राहण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर जमा झाला आहे. मात्र, आता त्यांची बदली होणार असल्याची चर्चा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमध्ये आहे. त्यांच्या जागी आता नागपूर पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी कोणत्या अधिकाऱ्याला देण्यात येणार याबाबत विविध कयास वर्तविण्यात येत आहेत. उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर असलेल्या नागपुरात येणाऱ्या नवीन अधिकाऱ्यावर मोठी जबाबदारी राहणार आहे.

इतरही शहरांना मिळणार नवे आयुक्त

गृह विभागाकडून नागपूरसोबतच पिंपरी चिंचवड, नवी मुंबई येथील आयुक्तांच्या बदल्यांचीदेखील तयारी सुरू झाली आहे. याबाबत अधिकाऱ्यांच्या नावाची चाचपणीदेखील झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय काही शहरातील सहपोलिस आयुक्त व इतर महत्त्वाच्या पदीदेखील नवीन अधिकारी मिळणार आहेत.

या अधिकाऱ्यांची नावे चर्चेत

अमितेश कुमार यांची बदली झाल्यास त्यांच्या जागी शासनाच्या मर्जीतील अधिकाऱ्याचीच नियुक्ती करण्यात येईल. नागपूरचे आयुक्तपद अपर पोलिस महासंचालकांच्या दर्जाचे आहे. विधि व सुव्यवस्था विभागाचे अपर पोलिस महासंचालक पदावर असलेले संजय सक्सेना, वायरलेस विभागाचे अपर पोलिस महासंचालक असलेले सुनील रामानंद, संजीव सिंघल, सुरेशकुमार मेकला, रवींद्र सिंघल आणि अनुपकुमार सिंह यांच्या नावांचीदेखील चर्चा आहे.

Web Title: reshuffle movements in the police force nagpur will get a new commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस