नागपुरात निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलनातून वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 07:07 PM2019-06-14T19:07:28+5:302019-06-14T19:08:11+5:30
कोलकाता येथील एनआरएस वैद्यकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधात निवासी डॉक्टरांची संघटना सेंट्रल मार्डने शुक्रवारी काम बंद आंदोलन करून लक्ष वेधले. या आंदोलनातून अतिदक्षता विभागा, अपघात विभाग व ट्रॉमा केअर सेंटर वगळण्यात आले होते. यामुळे रुग्णसेवा प्रभावित झालेली नव्हती. मात्र वरीष्ठ डॉक्टरांना याचा फटका बसला. त्यांना सकाळी बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी), तर दुपारी वॉर्डात आपली सेवा द्यावी लागली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोलकाता येथील एनआरएस वैद्यकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधात निवासी डॉक्टरांची संघटना सेंट्रल मार्डने शुक्रवारी काम बंद आंदोलन करून लक्ष वेधले. या आंदोलनातून अतिदक्षता विभागा, अपघात विभाग व ट्रॉमा केअर सेंटर वगळण्यात आले होते. यामुळे रुग्णसेवा प्रभावित झालेली नव्हती. मात्र वरीष्ठ डॉक्टरांना याचा फटका बसला. त्यांना सकाळी बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी), तर दुपारी वॉर्डात आपली सेवा द्यावी लागली.
डॉक्टरांवरील प्राणघातक हल्ल्याच्या विरोधात देशभरातील वैद्यकीय विश्व एकवटले आहे. मेयो व मेडिकलमधील निवासी डॉक्टरांनी सकाळी ८ वाजतापासून कामबंद आंदोलनाला सुरूवात केली. मेडिकलमध्ये सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. कल्याणी डोंगरे व अध्यक्ष डॉ. मुकूल देशपांडे यांच्या नेतृत्वात निषेध व्हिलचेअर रॅली काढण्यात आली. अपघात विभाग ते अधिष्ठाता कक्षापर्यंत काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये दोन डॉक्टरांना व्हिलचेअरवर बसविण्यात आले होते. जे डॉक्टर आपल्या प्राणाची बाजू लावून रुग्णांचा जीव वाचवितात, त्यांच्यावरच हल्ले वाढत असल्याचे हे प्रतिक असल्याचे डॉ. देशपांडे म्हणाले.
ही रॅली अधिष्ठाता कक्षापर्यंत पोहचल्यानंतर निवासी डॉक्टरांनी जोरदारे नारेबाजी केली. यावेळी डॉ. डोंगरे व डॉ. देशपांडे यांनी उपस्थितांना कोलकाता येथील घटनेची माहिती देत निवासी डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. असे हल्ले खपवून घेतले जाणार नाही. संविधानिक मार्गाने मागण्या लावून धरण्यात येतील, असेही ते म्हणाले. दरम्यान आंदोलनकर्ता डॉक्टरांचे शिष्टमंडळ अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांना भेटून मागण्यांचे निवेदन दिले.
या आंदोलनातून अपघात विभाग, अतिदक्षता विभाग व ट्रॉमा केअर सेंटर वगळण्यात आले होते. यामुळे मेयो, मेडिकलची रुग्ण सेवा फारशी प्रभावित झालेली नाही. कधी नव्हे ते वरिष्ठ डॉक्टर सकाळी ‘ओपीडी’मध्ये तर दुपारनंतर वॉर्डात ठाण मांडून होते.
आंदोलन सुरूच राहणार
शुक्रवरी काम बंद आंदोलनात सुमारे १२० निवासी डॉक्टर सहभागी झाले होते. निवासी डॉक्टरांना जो पर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत विविध मार्गाने हे आंदोलन सुरूच राहणार आहे. काळ्या फिती बांधून रुग्णसेवा व इतरही आंदोलनाचा माध्यामातून शासनाचे लक्ष वेधण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.
डॉ. मुकूल देशपांडे
अध्यक्ष मार्ड, मेडिकल