निवासी डॉक्टरांची जुन्या वसतिगृहातून सुटका नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:09 AM2021-07-07T04:09:30+5:302021-07-07T04:09:30+5:30
नागपूर : मेडिकलचा निवासी डॉक्टरांसाठी २५० खोल्यांचे वसतिगृह मार्च २०२० मध्येच पूर्ण होणार होते. परंतु कोरोनामुळे आणि आता निधी ...
नागपूर : मेडिकलचा निवासी डॉक्टरांसाठी २५० खोल्यांचे वसतिगृह मार्च २०२० मध्येच पूर्ण होणार होते. परंतु कोरोनामुळे आणि आता निधी उपलब्ध न झाल्याने वसतिगृहाचे बांधकाम रखडले आहे. यामुळे जर्जर झालेल्या व अर्धवट सोयींच्या ‘मार्ड’ वसतिगृहापासून निवासी डॉक्टरांची तूर्तास तरी सुटका होण्याची शक्यता नाही.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिळून ५७२ निवासी डॉक्टर आहेत. या डॉक्टरांच्या निवासासाठी ‘मार्ड’ वसतिगृह व वसतिगृह क्रमांक ६, व सुपर स्पेशालिटी हॉस्टेल परिसरात २७ खोल्यांचे वसतिगृह आहे. निवासी डॉक्टरांच्या तुलनेत हे वसतिगृह कमी पडते. परिणामी, एका खोलीत तीन डॉक्टरांना राहावे लागते. यात ‘मार्ड’चे वसतिगृह जुने व जीर्ण झाले आहे. गडरलाईनपासून पाण्याची समस्या आहे. चोवीस तास वैद्यकीय सेवेत असणाऱ्या निवासी डॉक्टरांसाठी हे वसतिगृह आरामदायी नसल्याने येथील गैरसोयींना घेऊन नेहमीच तक्रारीचा सूर आवळला जात होता. विशेष म्हणजे, तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा ‘कॉफी विथ स्टुडंटस्’ मध्ये निवासी डॉक्टरांनी वसतिगृहातील समस्यांचा पाऊसच पाडला होता. यावर आव्हाड यांनी अधिष्ठात्यांना धारेवर धरले होते. दरम्यानचा काळात मेडिकल व शासकीय दंत महाविद्यालयाच्या संयुक्त बांधकाम समितीने वसतिगृहांची पाहणी करून नूतनीकरणाचा प्रस्ताव मंत्र्यांकडे पाठविला होता. परंतु इमारतच मोडकळीस आल्याने नवीन इमारतीचा प्रस्ताव तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी पाठविला. त्याचा पाठपुरावाही केला. अखेर शासनाने नव्या वसतिगृहासाठी २८ कोटींना प्रशासकीय मंजुरी दिली. पहिल्या टप्प्यातील निधी मिळताच प्रत्यक्ष बांधकामला सुरुवात झाली. मार्च २०२० पर्यंत बांधकाम पूर्ण होणार होते. परंतु कोरोना काळात मजूर न मिळाल्याने आणि आता बांधकाम कंत्राटदाराचे २ कोटींवर पैसे थकल्याने बांधकाम रखडले आहे.
-तळमजल्यासह चार मजल्यांची इमारत
निवासी डॉक्टरांचे २५० खोल्यांचे हे वसतिगृह तळमजल्यासह चार मजल्याचे असणार आहे. प्रस्तावित बांधकामात प्रत्येक खोलीत स्वच्छतागृहाची सोय असेल. इमारतीत अद्यावत स्वरूपातील ‘जीम’ व ‘मेस’ राहणार आहे. परंतु सध्या तरी हे सर्व कागदावरच आहे.
- मार्च २०२२ पर्यंत पूर्ण होणार
बांधकाम विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, वसतिगृहाच्या बांधकामासाठी २८ कोटींची तरतूद केली आहे. यातील ७ कोटी रुपये खर्च झाले आहेत. कोरोना काळात मजूर न मिळाल्याने बांधकाम थांबले होते. आता मार्च महिन्यापासून निधी नाही. कंत्राटदाराचे २ कोटी थकल्याने बांधकामाचा वेग मंदावला आहे. यामुळे मार्च २०२० मध्ये पूर्ण होणारे हे बांधकाम आता २०२२ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.