निवासी डॉक्टरांच्या संपाने रुग्णसेवा प्रभावित; मेयो, मेडिकलमधील २५ टक्के शस्त्रक्रिया प्रभावित
By सुमेध वाघमार | Published: August 13, 2024 05:51 PM2024-08-13T17:51:16+5:302024-08-13T17:54:00+5:30
Nagpur : ‘आरजी कार’ मेडिकल कॉलेजमधील महिला डॉक्टरवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा घटनेची केंद्रीय यंत्रणेकडून निष्पक्ष तपास करण्याचा मुख्य मागणीसाठी निवासी डॉक्टरांचा देशभरात संप
सुमेध वाघमारे
नागपूर : शासकीय रुग्णालयाचा कणा असलेले निवासी डॉक्टर मंगळवारी सकाळपासून संपावर गेल्याने मेयो, मेडिकलमधील रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. संपातून आपत्कालीन रुग्णसेवा वगळण्यात आली असली तरी ओपीडी, वॉर्ड, नियोजित शस्त्रक्रिया, विविध तपासण्यांची कामे खोळंबली. उपचारात उशीर होत असल्याचा रुग्णांच्या तक्रारी होत्या.
कोलकात्याचा ‘आरजी कार’ मेडिकल कॉलेजमधील निवासी महिला डॉक्टरवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा घटनेची केंद्रीय यंत्रणेकडून निष्पक्ष आणि पारदर्शक तपास करण्याचा मुख्य मागणीसाठी निवासी डॉक्टरांची संघटना ‘सेंट्रल मार्ड’ने मंगळवारपासून देशभरात संप पुकारला. यात मेयो, मेडिकलचे निवासी डॉक्टरही सहभागी झाले होते. संपाचा रुग्णसेवेला फटका बसू नये म्हणून दोन्ही रुग्णालयांनी वरीष्ठ निवासी डॉक्टरांसह, वैद्यकीय अधिकारी, कंत्राटी डॉक्टरांवर विशेष जबाबदारी टाकली होती. असे असतानाही रुग्णांची हिस्ट्री घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यापासून ते डिस्चार्ज देण्याचे काम निवासी डॉक्टर करीत असल्याने मंगळवारी ते प्रभावित झाल्याचे दिसून आले. रुग्णसंख्येच्या तुलनेत मोजकेच डॉक्टर काम करीत होते. त्यामुळे उपचारात उशीर होण्याचे प्रमाण वाढले होते. काही विभागाच्या नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या होत्या. दरम्यान सकाळी ‘ओपीडी’समोर निवासी डॉक्टरांनी एकत्र येऊन नारेनिदर्शने केली.
८२२ निवासी डॉक्टर संपावर
मेडिकलमध्ये ६७२ तर मेयोमध्ये ३५० असे एकूण जवळपास १,०२२ निवासी डॉक्टर आहेत. त्यापैकी ८२२ डॉक्टर संपावर आहेत. २०० डॉक्टर आप्तकालीन सेवा देत आहेत.