नागपुरात निवासी डॉक्टरांचा संप, आरोग्य सेवा कोलमडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 11:15 PM2019-08-07T23:15:39+5:302019-08-07T23:16:17+5:30
निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपामुळे मेयो-मेडिकल मधील आरोग्य सेवा कोलमडली होती. ओपीडी बरोबरच वॉर्डमध्ये रुग्णांवर उपचार सेवा प्रभावित झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपामुळे मेयो-मेडिकल मधील आरोग्य सेवा कोलमडली होती. ओपीडी बरोबरच वॉर्डमध्ये रुग्णांवर उपचार सेवा प्रभावित झाली होती. निवासी डॉक्टरसंपावर गेल्याने ज्युनिअर डॉक्टर व नर्स यांच्या भरवशावर काम सुरू होते. त्यामुळे बरेच छोटे मोठे ऑपरेशन सुद्धा बुधवारी टाळण्यात आले. दोन्ही शासकीय रुग्णालयात वरिष्ठ डॉक्टर दिसले नाही. त्यामुळे परिस्थिती अतिशय गंभीर झाली होती. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना संपाचा चांगलाच फटका बसला.
मेयो-मेडिकल मधील निवासी डॉक्टरांनी एनएमसी विधेयकाच्या विरुद्ध व मानधन वेळेवर देण्याच्या संदर्भात, तसेच टीबी आजार झाल्यास सुटी व मॅटर्निटीची सुटी आदी मागण्यांसाठी संप पुकारला होता. बुधवारी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) तर्फे इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) मध्ये २०० निवासी डॉक्टर व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) मध्ये ४५० निवासी डॉक्टर काम बंद करून संपात सहभागी झाले. त्यामुळे दोन्ही शासकीय रुग्णालयात सकाळच्या सत्रात ओपीडी मध्ये रुग्णांची चांगलीच गर्दी होती. रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले नाही. वार्डामध्ये डॉक्टर नाही आल्याने भरती असलेल्या रुग्णांना उपचार मिळाले नाही. बुधवारी काही रुग्णांचे ऑपरेशन ठरले होते. त्यांचे ऑपरेशन पुढे ढकलण्यात आले. भरती वॉर्डमध्ये ज्युनिअर डॉक्टरांनी काम सांभाळले. वरिष्ठ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात ते काम करीत होते.
वेळेवर मानधन मिळत नाही
निवासी डॉक्टरांचे म्हणणे आहे की, आमच्या भरवशावर २४ तास आरोग्य सेवा सुरू राहत असतानाही, निवासी डॉक्टरांना वेळेवर मानधन मिळत नाही. दोन-दोन महिने मानधन दिले जात नाही. सुटीच्या बाबतीतही दुर्लक्ष आहे. टीबी सारखा गंभीर आजार झाल्यास किमान तीन महिन्याच्या सुटीचे प्रावधान आहे. महिला डॉक्टरांना मॅटर्निटी सुटी मिळणे गरजेचे आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, सरकारने या सुट्या लागू कराव्यात. त्याचबरोबर सरकारने एनएमसी विधेयकामध्ये दुरुस्ती करून आवश्यक बदल करावे.
तर संप सुरु राहील
मार्डचे अध्यक्ष डॉक्टर वीरेंद्र क दम म्हणाले की, मार्डने आपल्या मागण्यासंदर्भात आरोग्यमंत्री, मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे. आम्हाला सरकारकडून यावर सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. जेव्हापर्यंत निवासी डॉक्टरांची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत संप सुरू राहील.
मेडिकलमध्ये डॉक्टरांचे भीक मांगो आंदोलन
संपात सहभागी झालेल्या ४५० डॉक्टरांनी डीनच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. तर मार्डच्या वसतिगृहा बाहेर भीक मांगो आंदोलन केले. मार्डचे अध्यक्ष मुकुल देशपांडे यांनी सांगितले की, सरकारने आणलेल्या एनएमसी बिलाच्या विरोधात डॉक्टर आहे. सोबतच मानधन नियमित मिळत नसल्याने रोष आहे. त्यामुळे अनिश्चितकालीन संप सेंट्रल मार्डने पुकारला आहे. त्याच्या समर्थनात मेडिकलचे निवासी डॉक्टर संपावर आहे. जेव्हापर्यंत सेंट्रल मार्डचे आंदोलन सुरू राहील, तोपर्यंत आम्ही त्यांच्या सोबत आहे. यावेळी डॉ. शुभम इंगळे, डॉ. माज खान, डॉ. अनुपमा हेगडे, डॉ. प्रथमेश आसवले आदी उपस्थित होते.
तीन वर्षानंतरही मानधन वाढले नाही
डॉ. देशपांडे म्हणाले की, तीन वर्षापूर्वी निवासी डॉक्टरांना मंत्र्यांनी आश्वास्त केले होते की, ५ हजार रुपयांनी मानधन वाढेल. परंतु त्यावर आजपर्यंत कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. विशेष म्हणजे मेडिकलची संपुर्ण धुरा ही निवासी डॉक्टरांच्या खांद्यावर आहे. असे असतानाही आमच्याकडे दुर्लक्ष होत आहे.
आयएमएने संपातून घेतली माघार
एनएमसी बिलाच्या विरुद्ध आयएमएच्या नेतृत्वात सर्व खासगी डॉक्टर गुरुवारी सकाळी ६ पासून २४ तासाच्या संपावर जाणार होते. परंतु ऐनवळी पश्चिम व मध्य महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आयएमए नागपूरचे अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला यांनी सांगितले की, रुग्णांच्या हितार्थ हा निर्णय घेण्यात आला.