प्रतिरोध ही विवशता नव्हे साहस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:43 AM2017-09-16T00:43:39+5:302017-09-16T00:44:12+5:30

आपला देश सध्या सामाजिक संक्रमणाच्या अवस्थेतून जात आहे. अभिव्यक्ती, अस्वीकृती आणि टीका हे संविधानाने बहाल केलेले मूलभूत अधिकार आज राष्ट्रद्रोह ठरायला लागले आहेत.

Resistance is not compulsion, no courage | प्रतिरोध ही विवशता नव्हे साहस

प्रतिरोध ही विवशता नव्हे साहस

Next
ठळक मुद्देमनोज रूपडा : ‘प्रतिरोध का सिनेमा’ फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपला देश सध्या सामाजिक संक्रमणाच्या अवस्थेतून जात आहे. अभिव्यक्ती, अस्वीकृती आणि टीका हे संविधानाने बहाल केलेले मूलभूत अधिकार आज राष्ट्रद्रोह ठरायला लागले आहेत. विशेष म्हणजे, ही गळचेपी या देशाचे पालकत्व स्वीकारणारेच करताहेत. त्यामुळे त्यांच्याकडे न्यायाची दाद मागण्यात काहीच अर्थ नाही. अशा स्थितीत प्रतिरोध हा एकच पर्याय आहे. प्रतिरोध ही विवशता नाही तर साहसाचे कार्य आहे. हेच साहस ‘प्रतिरोध का सिनेमा’ तुमच्यात पेरणार आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध कथाकार मनोज रूपडा यांनी केले. ‘प्रतिरोध का सिनेमा’ या तीन दिवसीय फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन तरुणाईच्या भरगच्च उपस्थितीत धनवटे नॅशनल कॉलेज येथे पार पडले. यावेळी ते बोलत होते.
धनवटे नॅशनल कॉलेज, दक्षिणायन, राष्ट्रभाषा परिवार, प्रगतिशील लेखक संघ, कलश तिरपुडे मित्र संस्था, इप्टा व मेर्की थिएटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या चित्रपट महोत्सवात विविध विषयाला वाहिलेले चित्रपट, अ‍ॅनिमेशनपट, लघुपटांचे प्रदर्शन होणार आहे. यावेळी मंचावर संजय जोशी, रत्नाकर भेलकर व कलश तिरपुडे उपस्थित होते. या चित्रपट महोत्सवाच्या आयोजनामागची भूमिका सांगताना संजय जोशी म्हणाले, आम्ही गोरखपूरपासून या उपक्रमाची सुरुवात केली. सध्याचा सिनेमा खूप व्यवसायी होत चालला आहे. यात विचार कुठेच दिसत नाही. त्यामुळे समाजाला विचार देणारे चित्रपट आम्ही या महोत्सवात दाखवणार आहोत. यावेळी कलश तिरपुडे यांनीही विचार व्यक्त केले. उद्घाटनीय सत्राचे संचालन बसंत त्रिपाठी यांनी केले. यानंतर लगेच ‘सुरसुरी चाय’ व ‘हिटलर के साथी’ हे ‘प्रतिरोध का संगीत’ असलेले व्हिडिओ दाखविण्यात आले. या व्हिडिओला तरुणाईचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद ते सध्याच्या राजकीय गळचेपीकडे कसे आणि किती संवेदनशील दृष्टीने बघताहेत हे स्पष्टपणे दर्शवित होता.
तरुणाईला स्पर्शून गेली ‘गर्म हवा’
१९७३ मध्ये एम.एस. सथ्यू यांनी तयार केलेल्या ‘गर्म हवा’ या हिंदी सिनेमाचे भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासात विशेष महत्त्व आहे. संयुक्त भारताच्या फाळणीनंतर भारतातच राहिलेल्या मुसलमानांच्या आयुष्यातील दैनंदिन संघर्षाला हा चित्रपट अतिशय प्रामाणिकपणे प्रेक्षकांपुढे मांडतो. या चित्रपटात सथ्यू यांनी मांडलेली मिर्जा कुटुंबाची कथा आणि या कथेच्या अनुषंगाने फाळणीचे अदृश्य चटके हा चित्रपट पाहणाºया तरुणाईला प्रत्येक वळणावर जाणवत राहिले. देशाच्या फाळणीने ज्या जखमा दिल्या त्या कशा टाळता आल्या असत्या पण त्या टाळता आल्या नाही म्हणून आता त्या कशा जाणीवपूर्वक भळभळत ठेवल्या जात आहेत, याचे वास्तवदर्शी चित्रण दाखवून या चित्रपटाने तरुणाईला फाळणीमागच्या अस्पर्शित पैलूंचे विदारक दर्शन घडविले.
आज महोत्सवात
सकाळी पहिल्या सत्रात ‘गाडी लोहदरगा मेल’, ‘पी’, ‘अलाउद्दीन खान’, ‘यशपाल :अ लाईफ इन सायन्स’ हे चार लघुपट. दुपारच्या सत्रात ‘नवीन तंत्रज्ञानाच्या काळात नवा भारतीय सिनेमा’ या विषयावर संजय जोशी यांच्याशी चर्चा. संध्याकाळच्या सत्रात ‘मातीतली कुस्ती’, ‘अन्हे घोडे दा दान’ या दोन चित्रपटांचे सादरीकरण, अशी भरगच्च मेजवानी आहे.

Web Title: Resistance is not compulsion, no courage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.