अग्निशमन विभाग सक्षम करण्याचा संकल्प
By Admin | Published: April 16, 2017 01:41 AM2017-04-16T01:41:32+5:302017-04-16T01:41:32+5:30
उपराजधानीचा होत असलेला विकास विचारात घेता, महापालिकेच्या अग्निशमन विभागाचा अत्याधुनिक यंत्रसामग्री व मनुष्यबळाचा प्रश्न सोडवून .....
अग्निशमन सेवा दिवस : शहिदांना आदरांजली
नागपूर: उपराजधानीचा होत असलेला विकास विचारात घेता, महापालिकेच्या अग्निशमन विभागाचा अत्याधुनिक यंत्रसामग्री व मनुष्यबळाचा प्रश्न सोडवून विभागाला अधिक सक्षम करण्याचा संकल्प शुक्रवारी करण्यात आला. महापालिक ा मुख्यालयाच्या हिरवळीवर अग्निशमन विभागतर्फे अग्निशमन सेवा दिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अग्निशमन विभागात कार्य करताना शहीद झालेले विभागातील अधिकारी गुलाबराव कावळे, कर्मचारी प्रभू कुहीकर व रमेश ठाकरे आदींना यावेळी आदरांजली अर्पण करण्यात आली.
शासन निर्देशानुसार अग्निशमन विभागातर्फे १४ ते २० एप्रिल या कालावधीत अग्निशमन सेवा सप्ताह राबविला जाणार आहे. महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते या सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, आयुक्त श्रावण हर्डीकर, अग्निशमन विभागाचे प्रमुख बी.पी.चंदनखेडे आदी उपस्थित होते.
१४ एप्रिल १९४४ रोजी लंडनहून कराची मार्गे मुंबई गोदीत दाखल झालेल्या एस. एस. स्टिकींग या जहाजाचा स्फोट होऊन भीषण आग लागली.
या आगीशी झुंज देताना अग्निशमन दलाच्या ६६ जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले. या दिवसाचे स्मरण म्हणून अग्निशमनचे कार्य करताना प्राणाची आहुती देणाऱ्या सेवेतील शहिदांना मानवंदना म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.
कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, उपायुक्त रवींद्र देवतळे, नगररचना विभागाच्या सहायक संचालक सुप्रिया थूल, अधीक्षक अभियंता दिलीप जामगडे, अधीक्षक अभियंता (लोककर्म) मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता डी.डी.जांभूळकर, उपअभियंता राजेश दुपारे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)