संकल्प ग्लोबल; रुग्णालय मात्र लोकलच

By Admin | Published: April 24, 2017 01:43 AM2017-04-24T01:43:47+5:302017-04-24T01:43:47+5:30

आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, खासगी रुग्णालयात उपचार घेऊ शकत नाही, ...

Resolution Global; Hospital only locals | संकल्प ग्लोबल; रुग्णालय मात्र लोकलच

संकल्प ग्लोबल; रुग्णालय मात्र लोकलच

googlenewsNext

इंदिरा गांधी रुग्णालयाची व्यथा : गरिबांची लाईफ लाईन संकटात
गणेश हूड / आनंद डेकाटे नागपूर
आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, खासगी रुग्णालयात उपचार घेऊ शकत नाही, अशा गरजू व गरीब लोकांना महापालिकेच्या गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयातील उत्तम दर्जाच्या सुविधामुळे रुग्णांची मोठी गर्दी असायची. गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळायचा. म्हणूनच या रुग्णालयाचा नावलौकिक होता. परंतु प्रशासन व पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने नावलौकिक कायम ठेवणे तर दूरच, गरिबांची लाईफ लाईन ठरलेल्या या रुग्णालयाचे अस्तित्वच संकटात आले आहे.
इंदिरा गांधी रुग्णालयाची क्षमता ८० बेडची आहे. रुग्णालयाच्या तीन मजली इमारतीत बाह्य रुग्ण विभाग, फि जिओ थेरपी, डिपार्टमेंट, कॅज्युअलिटी, आॅपेरशन कक्ष एक्स -रे रुम, पॅथालॉजी असे विभाग सक्षमपणे कार्यरत होते. या रु ग्णालयात अवघड स्वरुपाच्या शस्त्रक्रिया होत होत्या. १५० ते २०० रुग्णांची ओपीडी होती. परंतु महापालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने गेल्या काही वर्षात रुग्णालयाला अवकळा आली आहे. सुविधांचा अभाव असल्याने आता ओपीडी ७० ते ८० पर्यंत खाली आली आहे.
गांधीनगरसारख्या व्हीआयपी भागात मोक्याच्या ठिकाणी या रुग्णालयाची तीन मजली इमारत आहे. १९८८ साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याहस्ते या रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले होते.
सुरुवातीला उत्तम देखभाल व सुविधा होत्या. परंतु गेल्या २९ वर्षात या वास्तुची डागडुजी वा दुरुस्ती करण्यात आलेली नाही. यामुळे ही वास्तु मोडकळीस आली आहे. मागील बाजूला स्लॅब उघडी पडली आहे.

... तर कशी होणार स्मार्ट सिटी
केंद्र सरकारने स्मार्ट शहराच्या यादीत नागपूरचा समावेश केला आहे. समाजातील सर्व घटकांचा समान विकास व नागरिकांना उत्तम दर्जाच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करणे हे स्मार्ट सिटीचे प्रमुख सूत्र आहे. अर्थातच यात आरोग्य सेवेचाही समावेश आहे. प्रशासन व पदाधिकारी स्मार्ट सिटीच्या स्वप्नात वावरत आहेत. परंतु सिमेंट रस्ते, सीसीटीव्ही कॅमेरे, वायफाय सुविधा म्हणजेच स्मार्ट सिटी नव्हे. शहरातील दुर्बल व गरीब लोकांना उत्तम दर्जाच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधाच नसतील तर स्मार्ट सिटी कशी होणार, असा प्रश्न शहरातील सर्वसामान्यांना पडला आहे.

विहीर चांगली पण कचऱ्याने भरलेली
रुग्णालय परिसरात एक मोठी विहीर आहे. त्या विहिरीचे पाणी रुग्णालयात वापरले जाते. विहिरीला भरपूर पाणी आहे. परंतु विहिरीत कचरा साचून आहे. हा कचरा स्वच्छ न केल्यास भविष्यात येथील पाणी दूषित होण्याची भीती नाकारता येत नाही.

नागपूर शहरात आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस (एम्स) उभारण्यात येणार आहे. परंतु गोरगरीब रुग्णांना उपचार मिळण्यासाठी इंदिरा गांधी रुग्णालय अधिक सक्षम करणे तितकेच महत्त्वाचे आहे. या रुग्णालयाची इमारत जीर्ण झाल्याने पुनर्विकासाचा ७२ लाखांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तत्कालीन महापौर प्रवीण दटके यांच्या कार्यकाळात आरोग्य विभागाने हा प्रस्ताव सादर केला होता. परंतु गेल्या तीन वर्षापासून हा प्रस्ताव धूळखात पडला आहे.
नाव मोठे लक्षण खोटे
नागपूर महानगरपालिकेद्वारा संचालित जी काही रुग्णालये आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाच्या आणि चांगल्या समजल्या जाणाऱ्या रुग्णालयात इंदिरा गांधी रुग्णालय ओळखले जाते. परंतु या रुग्णालयात गेल्यास नाव मोठे आणि लक्षण खोटे याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. रुग्णालयात उपलब्ध सेवा केवळ बोर्डावर दाखविण्यापुरतीच आहे. रुग्णांना अनेक चाचण्यांसाठी बाहेर पाठविले जाते. ही वस्तुस्थिती आहे.
जनरेटर बंद; रुग्ण अंधारात
रुग्णालयात जनरेटर आहे. परंतु ते नेहमीच बंद असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास रुग्णांना अंधारातच राहावे लागते. लोकमतच्या प्रतिनिधींनी रुग्णालयाला भेट दिली तेव्हा सुद्धा असाच प्रकार पहायला मिळाला. रुग्णालयात अंधार होता. जनरेटरबाबत विचारणा केली असता ते बंद असल्याचे सांगण्यात आले. येथील रुग्णांना विचारणा केली असता ही नेहमीचीच बाब असल्याचे त्यांचे म्हणणे होते.

महिलांची वॉशरुम बंद
रुग्णालयात आत शिरताच तळ मजल्यावर दोन वॉशरुम आहेत. एक पुरुषांसाठी तर त्याच्याच मागे महिलांसाठी. परंतु महिलांसाठी असलेली वॉशरूम बंद आहे. दरवाजाला कुलूप लावले असून त्यासमोर मोठे ड्रम ठेवले आहेत. त्यामुळे महिलांना त्रास सहन करावा लागतो.

उपराजधानी स्मार्ट होत आहे. मेट्रो रेल्वे, आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्था, एम्स, मिहान प्रकल्पांची कामे सुरू झालेली आहेत. परंतु शहरातील आरोग्य सुविधा सुद्धा महत्त्वाची आहे. मेयो व मेडिकल ही शहरातील दोन मोठी शासकीय रुग्णालये आहेत. या दोन्ही रुग्णालयांवरच रुग्णसेवेचा मोठा भार असल्याचे दिसून येते. महापालिकेची रुग्णालये आहेत. परंतु त्यांच्या अनेक समस्या आहेत. या रुग्णालयांमध्ये नेमक्या कोणत्या समस्या आहेत, याकडे पदाधिकारी व प्रशासनाचे लक्ष वेधणे आणि त्या सोडविण्याच्या प्रयत्न करणे या उद्देशाने ‘लोकमत’चा हा प्रयत्न.

Web Title: Resolution Global; Hospital only locals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.