‘गोंडवाना-गोरेवाडा’ आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या नामकरणाचा ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 09:09 PM2021-01-27T21:09:16+5:302021-01-27T21:10:25+5:30
Nagpur news Gorewada International Zoo गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची घोषणा २३ जानेवारीला मुख्यमंत्र्यांकडून मुंबईत झाल्यापासूनच नागपूरसह विदर्भातील आदिवासी समाज संघटना आणि नागरिकांकडून विरोध सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : येथील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचे नामकरण स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने होत असताना दुसरीकडे आदिवासी संघटनांच्या जनसभेत या विषयावरून प्रचंड आक्रोश सुरू होता. तब्बल चार तास चाललेल्या या सभेत शासकीय नामकरणाला विरोध दर्शवून ‘गोंडवाना-गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान’ असा ठराव मंजूर करण्यात आला. भविष्यात या नावानेच पत्रव्यवहार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची घोषणा २३ जानेवारीला मुख्यमंत्र्यांकडून मुंबईत झाल्यापासूनच नागपूरसह विदर्भातील आदिवासी समाज संघटना आणि नागरिकांकडून विरोध सुरू आहे. २६ जानेवारीला नामकरण समारंभाचे औचित्य साधून येथील राजे भक्त बुलंदशहा यांच्या पुतळ्यासमोर जनसभा झाली. त्यात हा ठराव घेण्यात आला.
माजी महापौर मायाताई इवनाते यांच्या पुढाकारातून झालेल्या या सभेला आ.डॉ. अशोक उईके, आ. डॉ. संदीप धुर्वे, आ.डॉ. देवराव होळी, राजे वीरेंद्र शहा उईके, माजी आमदार संजय पुराम, अरविंद गेडाम, प्रभुदास भिलवेकर, रमेश मावसकर, मधुकर उईके, दिनेश शेराम, हरी उईके, अमित कोवे, राजेंद्र मरस्कोल्हे, एम.एम. आत्राम, प्रकाश गेडाम, रंजिता कोडापे, आकाश मडावी, विवेक नागभिडे आदी उपस्थित होते.
नागपूर ही गोंडराजाची राजधानी होती. हा इतिहास नजरेपुढे ठेवून आणि आदिवासी समाजाच्या भावना लक्षात घेऊन या प्रकल्पाला ‘गोंडवाना-गोरेवाडा’असे नाव सरकारने द्यावे, अशा भावना यावेळी वक्त्यांनी मांडल्या. उपस्थितानी हात उंचावून आवाजी मताने त्याला पाठिंबा दर्शविला. सभेला मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. समाज संघटनांचा प्रखर विरोध लक्षात घेता पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त ठेवला होता. संपूर्ण सभेवर सीसीटीव्हीची निगराणी होती.
काळे झेंडे दाखविण्याचा कट उधळला
मुख्यमंत्र्यांच्या नागपूर दौरादरम्यान विमानतळ ते प्रकल्पादरम्यान काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्याची योजना आंदोलकांनी आखली होती. यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क होती. दरम्यान, काटोल नाक्यावर काही युवकांनी गोळा होऊन मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखविण्याची तयारी चालविली. मात्र पोलिसांच्या लक्षात ही बाब येताच सर्वांना ताब्यात घेऊन हा प्रयत्न हाणून पडला.
मुख्यमंत्र्यांकडून चर्चेचे निमंत्रण
प्रकल्पाचे उद्घाटन झाल्यावर मुख्यमंत्री आंदोलकांच्या पाच व्यक्तींच्या शिष्टमंडळाशी चर्चा करतील, असा निरोप पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून मायाताई इवनाते यांच्याकडे गेला. मात्र व्यासपीठावरील नेत्यांनी आणि इवनाते यांनी या प्रस्तावाला स्पष्ट नकार दिला. शिष्टमंडळ भेटीला जाणार नाही. मुख्यमंत्र्यांनी सभास्थळी येऊन सर्व समाजबांधवांशी संवाद साधावा, अशी भूमिका मांडण्यात आली. अर्थात ती मान्य झाली नाही.
..…...