महापालिका आयुक्तांचा शहर विकासाचा संकल्प; ५५६५ कोटींचा अर्थसंकल्प सादर
By गणेश हुड | Published: February 29, 2024 07:26 PM2024-02-29T19:26:08+5:302024-02-29T19:26:41+5:30
नागपूरकरांसाठी खूशखबर! कोणतीही करवाढ नाही
नागपूर : महापालिकेतील प्रशासकीय राजवटीतील सलग दुसरा अर्थात २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा नागरिकांवर करवाढ नसलेला १२३४ कोटी ९७ लाखांच्या आरंभीच्या शिलकीसह २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा ५ हजार ५६५ कोटी ७ लाख रुपयांचा अर्थसंकल्प गुरुवारी महापालिका आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सादर केला. आजवरच्या सर्वाधिक रकमेच्या या अर्थसंकल्पातून आयुक्तांनी शहर सौंदर्यीकरण व पर्यटनाला चालना देण्यासोबत विकासाचा संकल्प केला आहे.
अर्थसंकल्पात घरटॅक्स व पाणीपट्टीत कोणत्याही स्वरुपाची करवाढ केली नसल्याने शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जी-२० मध्ये नागपूर शहराचा चेहरामोहरा बदलला. याचा विचार करता शहर सौदर्यीकरणासाठी अर्थसंकल्पात प्रथमच नवीन लेखाशिर्ष उघडून यासाठी १० कोटींची तरतूद केली आहे. गरजेनुसार या निधीत वाढ केली जाणार आहे. तसेच शहरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रथमच अर्थसंकल्पात स्वतंत्र १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
शासनाकडून वस्तु व सेवाकरांच्या माध्यमातून आर्थिक वर्षात १ हजार ६४० कोटी ७४ लाखांचा निधी अपेक्षित आहे. मनपाचा मुख्य आर्थिक स्त्रोत असलेल्या मालमत्ता करातून ३३० कोटी, नगररचना विभाग ३३९ कोटी, पाणीपट्टीतून २५० कोटी, बाजार विभागाकडून २२. ६२ कोटी, मुद्रांक शुल्कपासून ७० कोटी तर जाहीरात विभागाला २५ कोटींचा महसुल प्राप्त होईल असा अंदाज आहे. आर्थिक वर्षात मनपाला स्वत: च्या आर्थिक स्त्रोतातून ३२३० कोटी तर शासनाकडून २ हजार कोटींहून अधिक निधी प्राप्त होईल. असा विश्वास अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केला.