बौद्ध उद्योजकांना चालना देण्याचा संकल्प : ६५०० उद्योजकांना जोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 10:57 PM2018-10-17T22:57:36+5:302018-10-17T23:03:00+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा देऊन जेमतेम ६२ वर्षे लोटली आहेत. महामानवाच्या प्रेरणेतून या पाच दशकात या समाजाने शिक्षण क्षेत्रात वेगाने प्रगती केली आहे. आता उद्योग क्षेत्रातही हा समाज पुढे येण्यासाठी धडपड करीत आहे. अपुरे भांडवल आणि भक्कम पाठबळ नसल्याने अनेक अडचणी आहेत. मात्र या अडचणींचे निराकरण करीत कल्पक उद्योजकांकडून वाटचाल केली जात आहे. अशा कल्पक उद्योजकांना चालना देण्यासाठी रत्नदीप कांबळे या तरुण उद्योजकाच्या संकल्पनेतून ‘बुद्धिस्ट उद्योजक’ समूहाचा उदय झाला आहे.
निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा देऊन जेमतेम ६२ वर्षे लोटली आहेत. महामानवाच्या प्रेरणेतून या पाच दशकात या समाजाने शिक्षण क्षेत्रात वेगाने प्रगती केली आहे. आता उद्योग क्षेत्रातही हा समाज पुढे येण्यासाठी धडपड करीत आहे. अपुरे भांडवल आणि भक्कम पाठबळ नसल्याने अनेक अडचणी आहेत. मात्र या अडचणींचे निराकरण करीत कल्पक उद्योजकांकडून वाटचाल केली जात आहे. अशा कल्पक उद्योजकांना चालना देण्यासाठी रत्नदीप कांबळे या तरुण उद्योजकाच्या संकल्पनेतून ‘बुद्धिस्ट उद्योजक’ समूहाचा उदय झाला आहे.
बौद्ध समाजातील तरुणांना व्यवसायात प्रोत्साहन देण्यासाठी सहा वर्षापूर्वी रत्नदीप यांनी ‘बुद्धिस्ट एन्टरप्रीनर्स असोसिएशन आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ या ग्रुपची स्थापना केली. लहान मोठा व्यवसाय करणाऱ्या बौद्ध उद्योजकांना एकत्रित करायचे हा मूळ उद्देश यामागे होता. बौद्ध तरुणाकडून झालेला अशाप्रकारचा पहिलाच प्रयत्न होता. पुढे कार्याचाही विस्तार होत गेला. एखादा व्यवसाय करण्यास इच्छुक तरुणाला त्याबाबत आवश्यक मार्गदर्शन, बँक फायनान्ससाठी मदत, रितसर नोंदणी करण्यापासून व्यवसाय वाढीसाठी आवश्यक गोष्टींचा पाठपुरावा या समूहातर्फे करण्याचे कार्य होत गेले. रत्नदीप आणि त्यांना जुळलेल्या सहकाºयांच्या प्रामाणिक प्रयत्नातून हळूहळू अनेक लहानमोठे उद्योजक त्यांच्याशी जुळले तर या संघटनेच्या मदतीने अनेक उद्योजक निर्माण झाले. विशेष म्हणजे अनेक बौद्ध महिला उद्योजिकासुद्धा या संघटनेशी जुळल्या असून संचालक म्हणून संघटनेची धुरा स्वीटी कांबळे या सांभाळत आहेत.
या सहा वर्षात या संघटनेसोबत साडेसहा हजार उद्योजकांना जोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे सर्व प्रकारचे व्यावसायिक या संघटनेसोबत आहेत. आपल्या सहकाºयांना व्यवसाय मिळवून देणे, कोणते प्रोडक्ट कुठे चांगल्या प्रकारे विकले जाईल याची माहिती देणे आणि सामान्य ग्राहकांना या सहकाºयापर्यंत पोहचविणे याचे प्रयत्न संघटनेने चालविले आहेत. अभय, अनंत, पूरब, विश्लेष, समीर, सुशील, संजय, अमोल, सविता, नितेश, पवन आदी सहकारी उद्योजक या कार्यात दिवसरात्र झटत आहेत. या प्रयत्नातून आज बौद्ध उद्योजकांचे जाळे देशातील १२ राज्यांसह जपान, श्रीलंका, आॅस्ट्रेलिया, युएई, इंग्लंड, युक्रेन आदी देशात पसरले आहेत. १४० व्हॉट्सअॅप ग्रुप आणि वेबसाईटच्या माध्यमातून हे उद्योजक एकमेकांशी जुळले आहेत. विशेष म्हणजे संघटनेच्या माध्यमातूनच वर्षाला ५ कोटींचा व्यवसाय या उद्योजकांना मिळत आहे. रत्नदीप यांच्या संकल्पनेतून बाबासाहेबांच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी बौद्ध उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे मोठे अभियानच उदयाला आले आहे.