गुन्हेगारी रोखण्याचा विद्यार्थ्यांचाही संकल्प

By admin | Published: January 8, 2015 01:19 AM2015-01-08T01:19:44+5:302015-01-08T01:19:44+5:30

शहरात गुन्हेगारी हद्दपार करण्याच्या उद्देशाने बुधवारी जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत पोलीस कर्मचाऱ्यांसह शेकडो विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन गुन्हेगारीवर आळा

Resolutions of students to prevent crime | गुन्हेगारी रोखण्याचा विद्यार्थ्यांचाही संकल्प

गुन्हेगारी रोखण्याचा विद्यार्थ्यांचाही संकल्प

Next

रेजिंग डे : शेकडो विद्यार्थ्यांचा जनजागृती रॅलीत सहभाग
नागपूर : शहरात गुन्हेगारी हद्दपार करण्याच्या उद्देशाने बुधवारी जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत पोलीस कर्मचाऱ्यांसह शेकडो विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन गुन्हेगारीवर आळा घालण्याचा संकल्प केला. तसेच ‘पोलीस आपले मित्र असून गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा’, असे आवाहनही विद्यार्थ्यांतर्फे करण्यात आले.
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त शहरात २ ते ८ जानेवारीदरम्यान ‘रेजिंग डे’ साजरा केला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत दररोज विविध पोलीस ठाणे अंतर्गत स्थानिक शाळा-महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्यात स्थानिक परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाते. त्यांना पोलिसांचे कर्तव्य, शस्त्र आणि इतर आवश्यक गोष्टींबाबत मार्गदर्शन केले जाते.
बुधवारी गुन्हे शाखेच्या सामाजिक विभागातर्फे जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती. व्हेरायटी चौक येथून या रॅलीला सुरुवात झाली. पोलीस आयुक्त के.के. पाठक यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला रवाना केले. याप्रसंगी सहपोलीस आयुक्त अनुपकुमार सिंग, पोलीस उपायुक्त निर्मला देवी, गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त दीपाली मासिरकर आदींसह वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
ही रॅली धंतोली, मुंजे चौक, व्हेरायटी चौक, मानव मंदिर, कॉटन मार्केट होऊन मुंजे चौक मार्गे पटवर्धन ग्राऊंडवर रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीदरम्यान गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच नागरिकांनी घ्यावयाच्या काळजीबाबतही जनजागृती करण्यात आली. या रॅलीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे ९०० विद्यार्थी आणि २०० पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
याशिवाय तहसील पोलीस ठाणे हद्दीतील सिंधी हिंदी विद्यालय येथे दुय्यम पोलीस निरीक्षक जी.एम. मुजावर यांच्या अध्यक्षतेखाली शाळेच्या विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनच्या कार्यप्रणालीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच झुनझुनवाला कन्या विद्यालय गांधीबाग आणि प्रकाश हायस्कूल नमकगंज येथे सुरक्षा व्यवस्थेबाबत माहिती देण्यात आली.
आतापर्यंत सदर पोलीस स्टेशनअंतर्गत अण्णासाहेब गुंडेवार कॉलेज काटोल रोड येथेही शस्त्रांचे प्रदर्शन व शस्त्रांसंबंधी माहिती देण्यात आली. कोतवाली पोलीस स्टेशनअंतर्गत वनिता विकास हायस्कूल गणेशनगर येथील विद्यार्थ्यांना पोलिसांची कार्यपद्धती व शस्त्रांसंबंधी माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)
आज समारोप
विद्यार्थ्यांना व नागरिकांना पोलिसांच्या कामाची पद्धत माहिती व्हावी, आणि शस्त्रांची माहिती उपलब्ध करून देत त्यांना पोलिसांचे मित्र करण्याच्या उद्देशाने २ जानेवारीपासून विविध पोलीस ठाणे हद्दीत ‘रेजिंग डे’ साजरा केला जात आहे. ८ जानेवारीला याचा समारोप करण्यात येईल.

Web Title: Resolutions of students to prevent crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.