न्याय मिळवून दिल्याचे समाधान - ज्योती वजानी
By Admin | Published: February 5, 2016 02:33 AM2016-02-05T02:33:15+5:302016-02-05T02:33:15+5:30
निष्पाप बालकाला आपण न्याय मिळवून दिला, हेच आपले मोठे समाधान असल्याचे मत अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी यांनी निकालानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
निष्पाप बालकाला आपण न्याय मिळवून दिला, हेच आपले मोठे समाधान असल्याचे मत अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी यांनी निकालानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, प्रकरण हाती घेतल्यापासून आठ वर्षीय युगला न्याय मिळवून देणे एवढेच आपले उद्दिष्ट होते. आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून आणि सुडाच्या भावनेतून अपहरण करून निष्पाप मुलाचा जीव घेतला. त्यांचे कृत्य अतिशय घृणास्पद आणि क्रूर होते. ही शिक्षा योग्य आहे आणि हीच अपेक्षा होती. वजानी यांनी चालविलेल्या बडेगाव खूनप्रकरणी सत्र न्यायालयाने ३० जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. पुढे हीच शिक्षा उच्च न्यायालयाने कायम ठेवली होती. वाडीच्या मुस्कान शर्मा या सहा वर्षीय बालिकेच्या बलात्कार-खून प्रकरणाचा खटला मोठ्या धीर गंभीरपणे चालविल्याने सत्र न्यायालयाने नराधम वसंता दुपारे याला फाशीची शिक्षा सुनावली होती. पुढे उच्च न्यायालयानेही या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले होते. दुपारेची फाशीची ही शिक्षा सर्वोच न्यायालयातही कायम राहिली. गाजलेल्या पिंटू शिर्के खूनप्रकरणीही ११ जणांना उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. वजानी यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता सत्र न्यायालयात हा खटला चालविला होता. सत्र न्यायालयाने आठ जणांना जन्मठेप सुनावली होती. बहुतांश बड्या खून खटल्यात त्यांनी पीडितांना न्याय मिळवून दिला आहे.