जनतेच्या समस्यांचे निरपेक्षपणे समाधान करावे
By admin | Published: May 24, 2016 02:55 AM2016-05-24T02:55:43+5:302016-05-24T02:55:43+5:30
कर-प्रशासनाच्या न्यायविषयक पैलूंची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत असताना नागरिकांच्या समस्यांचे निरपेक्षपणे समाधान करण्याच्या दिशेने ...
न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे : एनएडीटी येथे अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण वर्ग
नागपूर : कर-प्रशासनाच्या न्यायविषयक पैलूंची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत असताना नागरिकांच्या समस्यांचे निरपेक्षपणे समाधान करण्याच्या दिशेने अधिकाऱ्यांनी सतत प्रयत्नशील राहावे, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांनी येथे केले.
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी, नागपूर येथे सहायक आयकर आयुक्त या पदावर नुकतीच पदोन्नती मिळालेल्या आयकर अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण वर्गाचे (उत्तरायण-२०१६) उद्घाटन सोमवारी झाले. यावेळी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. मुख्य आयकर आयुक्त (निवृत्त) दिलीप शिवपुरी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
व्यासपीठावर राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या महासंचालिका गुंजन मिश्रा, आर.के.चौबे, लीना श्रीवास्तव, मदनेश कुमार मिश्रा उपस्थित होते.(प्रतिनिधी)
अधिकाऱ्यांच्या तुकडीत १६० प्रशिक्षणार्थी
दोन महिन्यांच्या कालावधीचे प्रशिक्षण घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तुकडीत १६० प्रशिक्षणार्थी असून या सर्वांना आयकर विभागात विविध नेमणूकानंतर सहायक आयुक्तपदी पदोन्नती दिली जाते. या तुकडीत १४ महिला अधिकारी असून तुकडीमधील अधिकाऱ्यांचा आयकर विभागातील सरासरी अनुभव २४ वर्षांचा आहे. २२ राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या तुकडीत सर्वात जास्त पश्चिम बंगालचे ४९ अधिकारी आहेत. तुकडीतील अधिकाऱ्यांची शैक्षणिक पार्श्वभूमीसुद्धा विविध प्रकारची असून यामध्ये पदवीधर,अभियांत्रिकी, कायद्याचे पदवीधर व आचार्य पदवी प्राप्त केलेले अधिकारीही आहेत. प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या शारीरिक सुदृढतेवरही पुरेसा भर दिला जातो. अकादमीमध्ये असणाऱ्या, व्यायामशाळा, आधुनिक जलतरण तलाव आणि उत्कृष्ट क्रीडा सुविधांचा वापर करण्यासाठी अधिकाऱ्यांना प्रोत्साहन दिले जाते. दोन महिन्यांच्या या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमानंतर एक आठवडा भारत दर्शन आणि आंतरराष्ट्रीय संघटनेसोबत एक आठवडा काम करण्याची संधी या अधिकाऱ्यांना मिळणार आहे.या प्रसंगी आयकर विभागातील वरिष्ठ अधिकारी, अकादमीमधील प्राध्यापक उपस्थित होते.
सेवेचे गुण आत्मसात करा
वराळे म्हणाले, आयकर अधिकाऱ्यांना भारतीय राजस्व सेवेत प्रवेश करताना या सेवेचे गुण आत्मसात करण्याची गरज आहे. एकंदरीत संपूर्ण भारतीय प्रशासनाची ओळख करून घेणे आवश्यक असते. सेवेची जबाबदारी सांभाळताना अधिकाऱ्यांनी आपल्या सर्वांगिण व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी छंदही जोपासायला हवेत.दिलीप शिवपुरी यांनी भारतीय राजस्व सेवेतील सहायक आयुक्त या पदाचे महत्त्व विषद करताना या सेवेच्या कार्यकारी भूमिकेमुळे देशभरातील कर प्रशासन कुशलरीतीने चालते, असे मत व्यक्त केले.