शेतकऱ्यांसाठी रिसोर्स बँक तयार करणार : कृषिमंत्री दादाजी भुसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 09:25 PM2020-02-07T21:25:32+5:302020-02-07T21:28:44+5:30
शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेतीची माहिती उपलब्ध करून देण्यासोबतच राज्यातील कृषी संशोधन व प्रगतिशील शेतकऱ्यांनी केलेल्या विविध उपक्रमांची माहिती एकत्र उपलब्ध करून देण्यासाठी ‘रिसोर्स बँक’तयार करण्यात येणार असल्याची घोषणा कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी शुक्रवारी येथे केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेतीची माहिती उपलब्ध करून देण्यासोबतच राज्यातील कृषी संशोधन व प्रगतिशील शेतकऱ्यांनी केलेल्या विविध उपक्रमांची माहिती एकत्र उपलब्ध करून देण्यासाठी ‘रिसोर्स बँक’तयार करण्यात येणार असल्याची घोषणा कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी शुक्रवारी येथे केली.
वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) येथे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली वनामतीच्या कृषी विषयक उपक्रमाचा तसेच कृषी विषयक व योजनांचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी तथा वनामती संचालक रवींद्र ठाकरे, कृषी विद्यापीठाचे संचालक दिलीप मानकर, सहसंचालक रवींद्र भोसले, सुभाष नागरे, कृषी विद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.डी.एम.पंचभाई,वनामतीचे अपर संचालक डॉ. अर्चना कडू, सी.पी.टी.पी.च्या संचालक सुवर्णा पांडे उपस्थित होते.
कृषी विभागाच्या विविध शेतविषयक योजनांची माहिती शेतकऱ्यांना व्हावी, तसेच त्यांच्या शेतीविषयक प्रश्नांबाबत मार्गदर्शन मिळावे यासाठी शेतकऱ्यांसोबत संवाद वाढवून त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्याची सूचनाही कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केली. शेतकऱ्यांना एका छताखाली कृषी सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देऊन प्रत्येक तालुका, उपविभागीय तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘सन्मान आणि मार्गदर्शन केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. येथे येणाºया प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतीविषयक प्रश्नांबाबत त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात यावे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
वनामतीला प्रशिक्षण व संशोधन संस्थेचा दर्जा
प्रभावी तांत्रिक मनुष्यबळ व शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या क्षमता बांधणीसाठी वनामती व राज्यातील इतर सात रामेती संस्था यांच्या सोईसुविधांचे सक्षमीकरण करणे गरजेचे असल्याचेही ते यावेळी म्हणाले. रिसोर्स बँकेच्या माध्यमातून कृषी संशोधन, प्रगतिशील शेतकऱ्यांचे अनुभव रिसोर्स बँकेच्यामाध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होतील. ही माहिती शेती करताना साहाय्यभूत ठरेल.
‘एक दिवस शेतावर’ उपक्रम राबवणार
शेतकऱ्यांना कृषी उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देण्यासोबतच त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी ‘एक दिवस शेतावर’ हा उपक्रम राज्यात राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत कृषिमंत्री महिन्यातून ‘एक दिवस शेतावर’ या उपक्रमात सहभागी होणार आहे. तसेच कृषी सचिव, आयुक्त यांनी पंधरवड्यातून एकदा तर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दर आठवड्याला शेतकऱ्यांच्या शेतावर उपस्थित राहून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात व कृषी उत्पादनासंदर्भात माहिती द्यावी, असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले. सचिव, कृषी अधिकाऱ्यांप्रमाणे मी देखील 'कृषिमंत्री' या नात्याने दर आठवड्याला शेतकऱ्यांच्या शेतात भेट देऊन पीक नियोजन, उत्पादन क्षमता याबाबत प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न, उत्पादकता आणि उपलब्ध बाजारपेठ या विषयी त्यांना मार्गदर्शन करता येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार
कृषिमंत्र्यांच्या हस्ते यावेळी विभागातील कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोगाद्वारे उत्कृष्ट शेती केलेल्या प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. भातशेतीमध्ये मत्स्य पालनासाठी गडचिरोलीचे गजेंद्र ठाकरे, भात लागवडीसाठी देवानंद दुमाने, सेंद्रिय शेतमाल विक्रीसाठी मंगेश चापले, शेततळ्यात मत्स्य उत्पादनासाठी उत्तम मिस्त्री, जैविक कीडनाशक उत्पादन व सेंद्रिय पध्दतीची फळलागवडीसाठी गोंदियाचे महेंद्र्र ठाकूर, भंडाराचे संजय एकापुरे यांना सामूहिक शेती व शेतमालाची थेट विक्री यासाठी, काटोल येथील मनोज जवंजाळ यांना उद्यान पंडित तर वर्धेचे कुंदन वाघमारे यांना शेळीपालन व केळी लागवडीसाठी, सुजाता भोयर यांना शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल, चंद्र्रपूर जिल्ह्यातील पांडुरंग कोकोडे यांना भाजीपाला, हळद लागवड तसेच विक्री, मधुमक्षिका पालन या कार्याकरिता कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.