दुसऱ्यांचे अस्तित्व, विचारांचा आदर करा : आचार्य लाेकेशन मुनिजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:12 AM2021-07-14T04:12:08+5:302021-07-14T04:12:08+5:30
नवी दिल्ली : भगवान महावीर स्वामी यांनी ‘आयतुलेपयासु’ म्हणजे सर्व आत्मा समान, कुणीही लहान-माेठा नाही, असे सांगितले हाेते. या ...
नवी दिल्ली : भगवान महावीर स्वामी यांनी ‘आयतुलेपयासु’ म्हणजे सर्व आत्मा समान, कुणीही लहान-माेठा नाही, असे सांगितले हाेते. या सिद्धांतामधून ‘वननेस’ किंवा ‘एकात्मता’ ही संकल्पना सहज लक्षात येते, असे विचार विश्व शांतिदूत व अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक आचार्य डाॅ. लाेकेश मुनिजी महाराज साहेब यांनी व्यक्त केले. संयुक्त राष्ट्र संघातर्फे घाेषित ‘डे ऑफ लिव्हींग टूगेदर इन पीस’ निमित्त आयाेजित ‘डिवाइन बियोंड डिवाइड्स : कॉम्पेशन, वननेस ॲन्ड इको-फ्रेंडलीनेस’ वेबिनारमध्ये ते बाेलत हाेते. वेबिनारचे आयाेजन व संचालन युनायटेड काॅशियसनेसचे ग्लाेबल कन्वेनर डाॅ. विक्रांतसिंह ताेमर यांनी केले.
मुनिश्री म्हणाले, प्रत्येकाने स्वत:चे अस्तित्व आणि विचारांप्रमाणे इतरांचे अस्तित्व आणि विचारांचा आदर करायला हवा. हेच भगवान महावीर यांच्या अहिंसेतील मूळ आहे. एखाद्या प्राण्याची हत्या करणेच म्हणजे हिंसा नव्हे तर एखाद्याप्रति वाईट चिंतन करणे ही सुद्धा एक प्रकारची हिंसा आहे.
आचार्य प्रवर यांनी करुणेच्या संदर्भात बाेलताना सांगितले, ‘‘असंविभागी न हु तस्स मोक्खो म्हणजे एक भाऊ उपाशी झाेपत असेल आणि दुसरा पाेटभर जेवण करीत असेल, अशी व्यक्ती माेक्षप्राप्तीची अधिकारी ठरू शकत नाही.’’ इकाे-फ्रेंडलीनेसबाबत महाराज म्हणाले, ‘‘षट्जीवनिकाय म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू, वनस्पती हे सर्व जीव आहेत. त्यांचे आवश्यकतेपेक्षा अधिक शाेषण करणे एकप्रकारे हिंसा आहे. मर्यादित गाेष्टीतही गरजा पूर्ण केल्या जाऊ शकतात. मात्र कुणाच्या अमर्याद इच्छांना पूर्ण केले जाऊ शकत नाही.’’
या वेबीनारमध्ये युनिव्हर्सल ग्रीन टेक्नालाॅजीचे संचालक डॉ. लियॉन मोस्स (अमेरिका), बर्थलाईटच्या संस्थापक व संचालक फ्रांसिस फ्रीडमैन (इंग्लंड), निद्रा कॉशियसनेस फाऊंडेशनचे संस्थापक योगी आंद्रे रिएहल (फ्रान्स), युरोपियन योगा फेडरेशनचे अध्यक्ष स्वामी सूर्यनन्दा (इटली) यांच्यासह जगभरातील अनेक विद्वान उपस्थित हाेते.