अग्निशमन सेवा महाविद्यालयात शहिदांना आदरांजली
By Admin | Published: April 16, 2016 02:36 AM2016-04-16T02:36:42+5:302016-04-16T02:36:42+5:30
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयात अग्निशमन सेवा दिवसानिमित्त गुरुवारी आयोजित कार्यक्रमात सहायक संचालक डी.के.शहा यांनी शहीद स्मारकावर ....
अग्निशमन सेवा दिवस : आग नियंत्रणाचे सादरीकरण
नागपूर : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयात अग्निशमन सेवा दिवसानिमित्त गुरुवारी आयोजित कार्यक्रमात सहायक संचालक डी.के.शहा यांनी शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून अग्निशमन विभागातील शहिदांना अभिवादन केले.
१९५६ साली स्थापना करण्यात आलेले नागपूर येथील अग्निशमन सेवा महाविद्यालय एकमेव आहे. अग्निशमन विभागातील जवानांना येथे आग नियंत्रणाचे प्रशिक्षण देण्यात येते. शहरीकरण व औद्योगिकीकरणामुळे अग्निशमन विभागाची जबाबदारी वाढली आहे. याचा विचार करता अग्निशमन सेवा क्षेत्राचा विस्तार व विकास केला जात आहे. विविध शाळांतील विद्यार्थ्यांना आग नियंत्रणाबाबत माहिती देण्याचा प्रयत्न या महाविद्यायाच्या माध्यमातून करण्यात येत असल्याची माहिती शहा यांनी दिली. महाविद्यालयात दरवर्षी १४ते २० एप्रिल दरम्यान अग्निशमन सेवा आठवडा साजरा केला जात आहे. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात विविध प्रकारच्या वाहनांना लागलेली आग, पेट्रोलियम पदार्थाचा टँकर, बहुमजली इमारत तसेच विमान अपघातानंतर लागलेली आग कशी आटोक्यात आणावी याबाबतचे सादरीकरण केले जाणार आहे.
तसेच अग्निशमन सेवा आठवड्यादरम्यान नागरिकांत आग नियंत्रणाबाबत जनजागृती करण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. नागपूर शहरातील ४० विद्यालयातील विद्यार्थ्यांना आगीपासून बचाव करण्याबाबतची माहिती दिली जाणार आहे. यावेळी आर.सी.मनिहार यांच्या नेतृत्वात स्मृती पथसंचलन करण्यात आले. मुख्य अतिथी म्हणून प्रा. डी.के. बोपर्डीकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)