शेतकऱ्यांचा ‘पीक विमा योजने’ ला प्रतिसाद
By admin | Published: July 30, 2016 02:30 AM2016-07-30T02:30:23+5:302016-07-30T02:30:23+5:30
यावर्षीपासून राज्यात प्रथमच राबविण्यात येत असलेल्या ‘पंतप्रधान पीक विमा योजने’ला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शेवटचे दोन दिवस :
अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
नागपूर : यावर्षीपासून राज्यात प्रथमच राबविण्यात येत असलेल्या ‘पंतप्रधान पीक विमा योजने’ला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ही योजना जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहचावी यासाठी कृषी विभाग युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. यात शेतकऱ्यांना गावोगावी माहिती दिली जात आहे. तसेच मार्गदर्शन केले जात आहे.
विशेष म्हणजे, केंद्र सरकारने पूर्वीची राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना रद्द करून त्या जागी आता ‘पंतप्रधान पीक विमा योजना’ जाहीर केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या एकूण १५ पिकांना संरक्षण मिळणार आहे. यात प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, धान, ज्वारी, बाजारी, तूर, मूंग, उडीद, नाचणी, मका, भुईमुंग, सूर्यफूल, तीळ व कांदा या पिकांचा समावेश आहे. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता केवळ शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहे. ३१ जुलै ही या योजनेची अंतिम तारीख जाहीर करण्यात आली आहे. तरी नागपूर जिल्हातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अर्चना कडू यांनी केले आहे. विशेष म्हणजे, यातून शेतकऱ्यांच्या पिकांना नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण कवच मिळणार आहे. ही योजना कर्जदार शेतकऱ्यांसाठी बंधनकारक आहे. मात्र बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ती ऐच्छिक आहे. या योजनेत शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी २ टक्के विमा हप्ता भरावयाचा असून, सर्व पिकांसाठी जोखिमस्तर हा ७० टक्के निश्चित करण्यात आला आहे. ही योजना रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून राबविली जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विम्याच्या अर्जासोबत पेरा प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज मंजूर झाले आहे, मात्र ज्यांनी पीक लागवडीमध्ये काही बदल केला, आणि त्याची अजूनपर्यंत बँकेला माहिती दिली नाही, अशा शेतकऱ्यांनी ताबडतोब पीक बदलाची माहिती द्यावी.