मनपात अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या नव्याने निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 10:32 PM2020-02-07T22:32:54+5:302020-02-07T22:34:37+5:30

: नागपूर महापालिकेतील विविध विभागांच्या कामात सुसूत्रता यावी आणि कार्य अधिक पारदर्शीपणे व्हावे, यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उपायुक्त दर्जापर्यंतच्या अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या नव्याने निश्चित केल्या आहे.

The responsibilities of the officers of the MNC are newly determined | मनपात अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या नव्याने निश्चित

मनपात अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या नव्याने निश्चित

Next
ठळक मुद्देकामात सुसूत्रता आणि पारदर्शकता : प्रशासकीय सुधारणा करण्याचा आयुक्तांचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महापालिकेतील विविध विभागांच्या कामात सुसूत्रता यावी आणि कार्य अधिक पारदर्शीपणे व्हावे, यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उपायुक्त दर्जापर्यंतच्या अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या नव्याने निश्चित केल्या आहे. प्रत्येक अधिकाऱ्याला वेगवेगळ्या विभागांची जबाबदारी देण्यात आली असून सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात ६ फेब्रुवारी रोजी आदेश काढले आहेत. मनपा आयुक्तांनी प्रशासकीय कामकाजात सुधारणा करण्याचे दृष्टीने हा मोठा निर्णय घेतला आहे.
या आदेशानुसार, ९ फेब्रुवारी २०१८ च्या शासन निर्णयानुसार नागपूर महानगरपालिकेत उपायुक्त संवर्गाच्या तीन वाढीव पदांना मान्यता मिळाली असून त्या संवर्गाची सात पदे झाली आहेत. महानगरपालिकेच्या विविध विभागामध्ये कामकाजाची जबाबदारी निश्चित करण्याबाबत व एकंदरीत कामकाजात सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने विविध विभाग आणि त्यांच्या अधिनस्त समाविष्ट कक्ष निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाचे विभागप्रमुख उपायुक्त (सा.प्र.वि.) राहतील. त्यांच्याकडे आयुक्तांचे कामकाज, सामान्य प्रशासन विभाग, आस्थापना, सुरक्षा विभाग, अधिकाऱ्यांना खासगी वाहने पुरविणे, भांडार विभाग, अभिलेख विभाग, विभागीय चौकशी विभाग, माहिती व जनसंपर्क विभाग, जनगणना, विधी विभाग, निवडणूक विभाग, लोकशाही दिन, आपले सरकार पोर्टल, पी.जी. पोर्टल आदी कामकाज राहील. समाज विकास विभागाचे विभाग प्रमुख उपायुक्त (समाजकल्याण) राहतील. त्यांच्याकडे दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान, महिला व बालकल्याण, दुर्बल घटक, अपंग कल्याण, गलिच्छ वस्ती सुधारणा आदीबाबतचे कामकाज राहील. कर विभागाचे प्रमुख उपायुक्त (महसूल) राहतील. त्यांच्याकडे मालमत्ता कर विभाग, स्थानिक संस्था कर विभाग, वस्तू व सेवा कर आदींचे कामकाज राहील. मालमत्ता विभागाचे प्रमुख उपायुक्त (मालमत्ता) राहतील. त्यांच्याकडे स्थावर कक्ष, जाहिरात कक्ष, बाजार कक्ष, परवाना कक्ष राहतील. अतिक्रमण विभागाचे विभागप्रमुख उपायुक्त (अतिक्रमण) राहतील. त्यांच्याकडे अतिक्रमण कक्ष, अतिक्रमण निर्मूलन, अनधिकृत बांधकाम नियंत्रण व निर्मूलन हे कामकाज राहील. आरोग्य विभागाचे विभागप्रमुख उपायुक्त तथा संचालक (घनकचरा व्यवस्थापन) हे राहतील. त्यांच्याकडे घनकचरा संकलन व व्यवस्थापन, स्वच्छ भारत अभियान (स्वच्छता), शहर स्वच्छता विषयक कामे, पशुवैद्यकीय सेवा आदी कामकाज राहील. उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाचे प्रमुख उपायुक्त (उद्यान) राहतील. त्यांच्याकडे उद्यान, वृक्ष प्राधिकरण,अमृत-ग्रीन स्पेस योजना राहील. सचिवालयाचे विभागप्रमुख महापालिका सचिव राहतील.

  •  शिक्षण विभागाचे प्रमुख शिक्षणाधिकारी राहतील. त्यांच्याकडे सर्व शैक्षणिक सेवा, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, समग्र शिक्षा अभियान, मध्यान्ह भोजन योजना, क्रीडा व सांस्कृतिक विभाग, ग्रंथालय व अध्ययन कक्ष आदींचे कामकाज राहील.
  •  नगररचना विभागाचे प्रमुख सहायक संचालक (नगर रचना) राहतील. त्यांच्याकडे नगररचना, शहर विकास आराखडा ही कामे राहतील.
  •  वित्त व लेखा विभागाचे प्रमुख मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी राहतील तर लेखा परीक्षण विभागाचे प्रमुख मुख्य लेखा परीक्षक राहतील.
  •  सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख अधीक्षक अभियंता (सा.बां) हे राहतील. त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत असलेली सर्व प्रकारची कामे, वाहन व यांत्रिकी विभाग, इमारती व बांधकाम विभाग, हॉट मिक्स प्लँट, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण विभाग, प्रधानमंत्री आवास योजना ही कामे राहतील.
  •  सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख अधीक्षक अभियंता (सा.आ.अ.) राहतील. त्यांच्याकडे पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया, सांडपाणी नियोजन व व्यवस्थापन, अमृत योजना (पाणी पुरवठा), सर्व पाणीपुरवठा व सांडपाणी विषयक बाबी ही कामे राहतील.
  •  विद्युत विभागाचे प्रमुख कार्यकारी अभियंता (विद्युत विभाग) राहतील. पर्यावरण विभागाचे प्रमुख (कार्यकारी अभियंता (पर्यावरण विभाग) राहतील. शहर वाहतूक (नियोजन व व्यवस्थापन) विभागाचे प्रमुख वाहतूक नियोजन अधिकारी राहतील.
  •  अग्निशमन विभागाचे प्रमुख मुख्य अग्निशमन अधिकारी राहतील. त्यांच्याकडे अग्निशमन व आणीबाणी सेवा विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग राहील.
  •  आरोग्य विभाग (वैद्यकीय) विभागाचे प्रमुख वैद्यकीय आरोग्य अधिकारी राहतील. त्यांच्याकडे वैद्यकीय आरोग्य सेवा, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, राष्ट्रीय साथरोग व लसीकरण कार्यक्रम व इतर सर्व आरोग्याशी संबंधित कार्यक्रम राहतील.
  •  माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख संचालक माहिती व तंत्रज्ञान हे राहतील. त्यांच्याकडे ई-गव्हर्नन्स व नागरी सुविधा केंद्रांतर्गत येणारी कामे राहतील.

 

 

 

Web Title: The responsibilities of the officers of the MNC are newly determined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.