अपघात विभागाची जबाबदारी आता प्राध्यापकांवर
By admin | Published: September 14, 2016 03:20 AM2016-09-14T03:20:15+5:302016-09-14T03:20:15+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अपघात विभागाची जबाबदारी आता संबंधित विभागाच्या प्राध्यापकांवर असणार आहे.
मेडिकल : रुग्णांवरील उपचारांवर ठेवणार लक्ष
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अपघात विभागाची जबाबदारी आता संबंधित विभागाच्या प्राध्यापकांवर असणार आहे. या संदर्भातील निर्देश बुधवारी जारी करण्यात येणार असून यामुळे रुग्णांना तत्काळ व योग्य उपचार मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अपघात विभागात वाढलेली रुग्णसंख्या, अपुरी जागा व तत्काळ उपचारासाठी डॉक्टर आणि रुग्णांमध्ये उडणारे खटके कमी करण्यासाठी गेल्या वर्षी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी शल्यचिकित्सा (सर्जरी) व औषधवैद्यकशास्त्र विभागाचा (मेडिसीन) अपघात विभाग स्वतंत्र केला. हा विभाग दोन भागात विभागला गेल्याने गर्दी कमी झाली. रुग्णांना तातडीने उपचार मिळू लागले. आता यात आणखी प्रभावी बदल करण्याचा निर्णय डॉ. निसवाडे यांनी घेतला आहे. अपघात विभागात येणाऱ्या रुग्णांची जबाबदारी संबंधित विभागाच्या प्राध्यापकांवर टाकली जाणार आहे. यामुळे काही निवासी डॉक्टरांची मनमानी कमी होऊन रुग्णांना योग्य उपचार मिळण्याची शक्यता आहे. सूत्रानुसार, या संदर्भातील एक पत्र बुधवारी जारी करण्यात येणार आहे. आतापर्यंत विभागाचे प्राध्यापक बाह्यरुग्ण विभाग व आपल्या वॉर्डापुरते मर्यादित रहायचे. परंतु नव्या निर्णयामुळे अपघात विभागात ते स्वत: बसणार असल्याने या विभागाचा दर्जा वाढणार आहे. विशेषत: गंभीर रुग्णांना याचा मोठा फायदा मिळणार आहे. (प्रतिनिधी)
शुल्क भरण्याची धावपळ व्हावी कमी
मेडिसीनच्या अपघात विभागात विविध उपचाराचे शुल्क भरण्याची सोय नाही. रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना धावपळ करीत सर्जरीच्या अपघात विभागात जावे लागते. येथे एकच खिडकी असल्याने रांग लागलेली असते. रुग्णाचा ईसीजी जरी करावयाचा असेल तर पहिले शुल्क भरावे लागते. अशावेळी रुग्णाचा जीव धोक्यात येतो. एकीकडे रुग्णालय प्रशासन रुग्णाच्या हिताचे नवेनवे निर्णय घेत असताना याकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.